आस मैदानाची
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : इटलीत २०१७ मध्ये होणाऱ्या विश्व अमॅच्युअर चॅम्पियनशिपसाठी जळगावच्या रोहित पाटील याची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्याला आर्थिक कारणांमुळे या स्पर्धेसाठी जाता आले नाही. आता सध्या तो ऑनलाईन स्पर्धांमध्ये खेळत आहे.
२०१२-१३ मध्ये जळगावच्या रोहित पाटील याने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याच्या चतुर खेळाने त्याने पुढच्या दोन वर्षांतच फिडे रेटिंग मिळविले. त्याने २०१४ मध्ये पहिल्यांदा फिडे रेटिंग मिळवले. त्यानंतर त्याने सातत्याने फिडे रेटिंगमध्ये वाढ केली. २०१७ मध्ये रोहित याने १७६४ एवढे रेटिंग मिळवले होते. त्याने महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धेत देखील विजेतेपद पटकावले आहे. त्यासोबतच तो अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कर्णधार देखील होता. त्याने राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत त्यानंतर एकही स्पर्धा झाली नाही. त्याने आपले प्रशांत कासार यांच्याकडे प्रशिक्षण घेतले होते.
गेल्या दीड वर्षात त्याला स्पर्धांमध्ये खेळायची फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे आता पुढच्या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या तो पदवीच्या वर्गाला आहे. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करत आहे. बुद्धिबळाच्या मोठ्या स्पर्धा नसल्याने शक्य होतील तेवढ्या ऑनलाईन स्पर्धादेखील खेळत आहे.
ती लढत संस्मरणीय
आतापर्यंत आपल्या संस्मरणीय सामन्याबद्दल रोहित याने सांगितले की, २५ वर्षांआतील महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपच्या अखेरच्या फेरीत २१०० रेटिंग असलेल्या इंद्रजित महिंद्रकर याच्यासोबत त्याची लढत झाली होती. ही लढत बरोबरीत सुटली होती. दोघांना प्रत्येकी अर्धा गुण मिळाला होता. मात्र, रोहित याने स्पर्धेत एकूण साडेसात गुण मिळवले होते. त्यामुळे रोहित हा विजेता ठरला. मात्र, आपल्यापेक्षा खूपच जास्त फिडे रेटिंग असलेल्या खेळाडूला अटीतटीच्या सामन्यात बरोबरीत लढत सोडवायला लावणे, हीच बाब त्यावेळी खूप मोठी ठरली असल्याचे रोहित याने सांगितले.