विनायक वाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती आणि ७९ गावांची जबाबदारी केवळ एकाच तांत्रिक पॅनल अधिकाऱ्यावर येऊन पडल्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत तब्बल तीन हजार कामे रखडली आहेत. अतिरिक्त कर्मचाऱ्यांमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना पंचायत समिती कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागत आहेत.
मुक्ताईनगर पंचायत समितीअंतर्गत ‘रोहयो’ची विविध कामे सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने गुरांचे गोठे, घरकुल वृक्षलागवड आणि इतर रोहयोच्या विविध कामांचा समावेश आहे. जवळपास तीन हजारांवर कामांसाठी तेवढ्याच क्षमतेने कर्मचारी व अधिकारी अपेक्षित असताना केवळ एक तांत्रिक पॅनल अधिकाऱ्याच्या खांद्यावर संपूर्ण ६२ ग्रामपंचायतींचा कारभार आल्याने रोहयोची कामे रखडत आहेत. त्यामुळे मास्टर काढण्यासाठी किंवा रोहयोच्या विविध कामांचे विविध अपूर्ण किंवा रिक्त काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट होते. रोज पंचायत समितीला चकरा होत आहेत.
मुक्ताईनगर पंचायत समितीअंतर्गत तीन तांत्रिक पॅनल अधिकारी यांची पदे असून, त्यांपैकी भूषण चंदने हे एकमेव (टीपीओ) म्हणून कार्यरत आहेत, तर डाटा एंट्री ऑपरेटरची दोन पदे रिक्त असून साहाय्यक कार्यक्रम अधिकारी यासाठी दोन पदे असताना केवळ एकच व्यक्ती काम करीत आहे. अशा प्रकारे जवळपास सहा पदे रिक्त आहेत. परिणामी रोहयोच्या कामांना गती मिळत नसल्याची तक्रार रोजगार सेवक व लाभार्थी करीत आहेत.
ही पदे तत्काळ भरण्यात यावीत. जेणेकरून ग्रामस्थांना व लाभार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल; परंतु याबाबत वेळोवेळी मागणी करूनही पाठपुरावा नसल्याने या जागा भरल्या जात नाहीत. त्यामुळे काम करणाऱ्या एकाच अधिकाऱ्यावर भार येऊन नागरिकांचा रोष ओढवला जात आहे. यातूनच त्यामुळे प्रसंगी वादाचे खटके उडून, काम करूनही अपमान सहन करण्याची पाळी चंदनेसारख्या अधिकाऱ्यावर येत आहे.
तालुक्यातील कुऱ्हा, अंतुर्ली व मुक्ताईनगर या तीनही परिसरासाठी स्वतंत्र तांत्रिक पॅनल अधिकारी असणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रत्यक्ष कामाच्या स्थळी जाऊन निरीक्षण करण्यास सोपे जाऊ शकते. एक अधिकारी ६२ ग्रामपंचायतींना व त्या अंतर्गत येणाऱ्या ७९ गावांना भेटी देणार कधी? हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन तांत्रिक पॅनल अधिकाऱ्यासह दोन डाटा एंट्री ऑपरेटर आणि साहाय्यक कार्यक्रमाधिकारी यांचीदेखील जागा रिक्त असल्याने एकच अधिकाऱ्यावर कामाचा ताण आलेला आहे. ही पदे लवकरात लवकर भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
- संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी, मुक्ताईनगर
संपूर्ण तालुक्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर असल्याने काम करीत असताना थोडा विलंब लागणे साहजिकच आहे. तसेच लाभार्थ्यांची कामेदेखील वेळेवर होणे शक्य नाही. तीन अधिकाऱ्यांचे काम माझ्या एकट्यावर येऊन पडल्याने सर्वांना तत्काळ न्याय देणे हे तर्कसंगत होऊ शकत नाही.
- भूषण चंदने, तांत्रिक पॅनल अधिकारी
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मुक्ताईनगर पंचायत समितीला केवळ एकच तांत्रिक पॅनल अधिकारी असल्याने गावातील रोजगार हमीची कामे रखडली आहेत. त्यामुळे तत्काळ ही पदे भरण्यात यावीत.
- अमोल देशमुख, ग्रामरोजगार सेवक