भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चांदनी (म.प्र.) रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे छत खाली कोसळले. ही घटना २६ मे रोजी दुपारी ३.५५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही वा वाहतुकीवरही परिणाम झाला नाही. मात्र, रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांची काही वेळ धावपळ उडाली.
चांदणी रेल्वे स्थानकाच्या या इमारतीची निर्मिती सन २००७ मध्ये करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत ठेकेदाराकडून या इमारतीच्या कामाचे कंप्लिशन प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. इतक्या कमी काळात इमारत कशी ढासळली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवघ्या १३ वर्षांतच ही इमारत कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
या घटनेत कार्यालयातील सामानाचे मात्र नुकसान झाले आहे. साधारण ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दुर्घटनेनंतर स्थानकाच्या कामकाजात काही प्रमाणात अडचणी येत आहेत. मात्र, कामकाज सुरळीत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच, एडीआरएम मनोजकुमार सिंहा, वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) राजेश चिखले, सीनियर डीएसटी निशांत त्रिवेदी यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी भुसावळ येथून घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.