लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह ७ डॉक्टर कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर परतले असून आता कोविड उपचारांच्या नियोजनाला गती आली आहे. शिवाय औरंगाबाद, नागपूर नांदेड येथून ८ डॉक्टर आल्याने मंगळवारी १२ क्रमांकाचा कक्ष व पीएनसी कक्षात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. जिल्हधिकारी अभिजित राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी रुग्णालयात येऊन आढावा घेतला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून बेड मॅनेजमेंट व मनुष्यबळाचा मुद्दा अधिकच गंभीर झाला होता. चौदा दिवसांच्या उपचारानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामनंद मंगळवारी रूजू झाले. त्यांनी तातडीने सर्व कक्षांचा आढावा घेतला. डॉक्टरांवर जबाबदाऱ्या सोपविल्या, काही समित्या तयार करण्यात आल्या असून बेड मॅनेजमेंटसाठी स्वतंत्र यंत्रणा लावण्यात आली आहे. पूर्ण ३५६ बेड सुरू करणार असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.
तो आयसीयूही उघडणार
आता टप्प्याने टप्प्याने सर्वच कक्ष उघडण्यात येतील, यात नवजात शिशू काळजी कक्ष विभागात असलेल्या अत्याधुनिक आयसीयूही उघडण्यात येणार आहे. यात १५ बेड असून व्हेंटीलेटर्स आहेत. हा अतिदक्षता विभाग उघडण्यात आल्यानंतर मोठा दिलासा रुग्णांना मिळणार आहे. येत्या एक दोन दिवसात या कक्षांबाबतही लवकरच नियोजन होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
हे डॉक्टर झाले रुजू
नागपूर येथील डॉ. आशिष झरारीया, डॉ प्रविण शिंगाडे, डॉ. विजय पाटील, डॉ. बापू येलम, डॉ. भरत ठाकरे, डॉ. राहूल गडपाल, औरंगाबाद येथील डॉ. प्रशांत भिंगारे, नांदेड येथील डॉ. राहूल परसोडे हे प्रतिनियुक्तीवरील डॉक्टर मंगळवारपासून सेवेत रुजू झाले आहेत.
मध्यवर्ती खाट व्यवस्थानाचा आढावा
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोवड रुग्णालयात टास्कफोर्स सोबत सर्व आढावा घेतला या बैठकीत नाशिकच्या धर्तीवर मध्यवर्ती खाटा व्यवस्थापन पद्धत सुरु करण्याविषयी एकमत झाले असून त्यासाठी लवकरच यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील एकूण खाटा उपलब्धता किती आहे त्याविषयी माहिती वेळोवेळी उपलब्ध होणार आहे. शासकीय रुग्णालयात पूर्ण खाटा कोरोना रुग्णांसाठी सुरु करायला काय करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात आले.
रुग्णांसाठी वॉर रूम, खाटा प्रवेश व्यवस्थापन समिती, मृत्यू समन्वय समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे समन्वयाचे कामकाज सोपे जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी आयएमए व निमा संस्थेची काही मदत घेता येईल का यावर चर्चा झाली.
यावेळी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुशील गुर्जर, डॉ. लीना पाटील, डॉ. गुणवंत महाजन, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. राहुल महाजन, डॉ. निलेश चांडक, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. संदीप पटेल, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. प्रसन्ना पाटील, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. गिरीश राणे, डॉ. नरेंद्र पाटील, अधिसेविका कविता नेतकर उपस्थित होते.