जळगाव : माजी नगरसेवक संतोष मोतीलाल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात फरार असलेला जीगर उर्फ भूषण रमेश बोंडारे (रा.उमाळा, ता.जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे अडीच वाजता नाशिक येथून ताब्यात घेतले. दरम्यान, या गुन्ह्यात अटकेत असलेला अरबाज दाऊद पिंजारी (रा.हरविठ्ठल नगर, जळगाव) याला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.सोमवारी सकाळी दहा वाजता सावखेडा शिवारातील आर्यन पार्क भागात संतोष पाटील यांच्यावर गोळीबार झाला होता. प्रत्युत्तरात त्यांनी रिव्हॉल्वर काढल्याने पाटील बालंबाल बचावले. गुन्हा घडल्याच्याच दिवशी सायंकाळी संशयित अरबाज हा सायंकाळी पोलिसात हजर झाला होता. तर जीगर बोंडारे हा फरार झाला होता. जीगर याच्या शोधार्थ पोलिसांची सहा पथके कार्यरत होती. तो नाशिक येथे बहिणीच्या दिराकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. पहाटे अडीच वाजता घरात झोपलेला असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुपारी तीन वाजता त्याला शहरात आणण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली चौकशीअपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी व सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी त्याची चौकशी केली. या गुन्ह्यात आपण नव्हतोच, असे तो चौकशीत सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात जीगरचा मित्र म्हणून ओळख असलेल्या एका निलंबित पोलिसालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.दोन महिन्यापासून पाठलागसंतोष पाटील यांचा हत्येचा कट दोन महिन्यापासून रचण्यात आला होता. तेव्हापासून दोन जण पाटील यांच्या मागावर होते. पाटील हे दररोज कारनेच शेतात जायचे, ३१ डिसेंबरलाच ते दुचाकीने गेले. त्याची माहिती मिळताच अरबाज व जीगर यांनी त्यांचा पाठलाग केला आणि शेताच्याजवळच त्यांच्यावर हल्ला केल्याचे अरबाज याने पोलीस तपासात सांगितले आहे.मागे बसलेल्या जीगरने केला गोळीबारतपासाधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी अरबाज पिंजारी याला न्या.डी.बी.साठे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आपण दुचाकी चालवत असताना मागे बसलेल्या जीगर याने संतोष पाटील यांच्यावर गोळीबार केला असे अरबाज याने चौकशी सांगितले आहे. तसेच हटकर परिवारासोबत केव्हा व कुठे कट रचला याची चौकशी करावयची असल्याचे सांगून वकीलांनी पोलीस कोठडीची विनंती केली. सरकारतर्फे अॅड.रंजना पाटील यांनी काम पाहिले. या प्रकरणात बुधा दला हटकर, कैलास बुधा हटकर, आनंदा बुधा हटकर, लखन नारायण हटकर, राहूल सुरेश हटकर व ईश्वर तायडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही.
जीगरच्या नाशिक येथून आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:56 PM
गोळीबार प्रकरण
ठळक मुद्देअरबाजला पाच दिवस पोलीस कोठडी