जळगाव : रोटरी क्लबतर्फे वॉटर शेड मॅनेजमेंट हा प्रकल्प राबवण्यात येत असून त्यासाठी पुढील महिन्यात सर्व्हे केला जाणार आहे. या गावांमध्ये नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती रोटरीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी दिली. भामरे यांनी सोमवारी लोकमतच्या शहर कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भामरे यांनी रोटरीच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की, रोटरीतर्फे काही गावे दत्तक घेण्याचीही संकल्पना असून गावातील मुलभूत सोयीसुविधांबरोबरच तेथील साक्षरतेचा दरही वाढवण्याचे ठरवण्यात आले आहे. २०२५पर्यंत याठिकाणी प्रौढांमध्ये ९० टक्के दर वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर डिजीटल स्कूल, बालविकास अशा संकल्पनाही राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.वॉशिंग स्कूलअंतर्गत हॅण्ड वॉश स्टेशन उभारण्यात येणार आहेत. आताच्या काळात तयार हॅण्ड वॉश स्टेशन मिळतात. शाळेच्या पटसंख्येनुसार त्याचे वाटप रोटरी तर्फे करण्यात येणार आहे.- ३ मॅमोग्राफी बसेस रोटरीतर्फे सुरु करण्यात आल्या आहेत. याव्दारे महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे, असे ते म्हणाले. मुसळी व दुधखेडा येथे पूर्वी १० ते १५ दिवस पाणी नव्हते. आता त्याठिकाणी १० ते १५ फूट पाणी असून हे रोटरीने तेथे राबवलेल्या उपक्रमांचे यश आहे, असे भामरे म्हणाले.
वॉटर शेड मॅनेजेंटसाठी रोटरीतर्फे फेब्रुवारीत सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 1:10 PM