जळगाव : कोरोना संकट असो अथवा इतर कोणतीही आपत्ती असो, या काळात रोटरी परिवार स्वत:ला झोकून देत सामाजिक नाते जपते. आता ‘लोकमत’च्या महारक्तदान अभियानात सहभागी होत या सामाजिक नात्याला रक्ताच्या नात्याची जोड देण्याचा निर्धार रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोरोना काळात गेल्या वर्षभरात रोटरी परिवाराने आरोग्यविषयक उपाययोजनांसह शैक्षणिक, सामाजिक कार्यातही ठसा उमटविणारी कामे केली असून आगामी काळातही विविध संकल्प रोटरीने केले आहे.
गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कोरोनाच्या संकटाने विविध क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. यात रक्ताचा तुटवडा हीदेखील मोठी समस्या पुढे आली आहे. त्यात आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नियोजित शस्त्रक्रिया होण्यासह वाहतूक वाढून अपघातासारख्या घटना घडल्यास या काळात रक्ताची मोठी गरज भासणार आहे. ही गरज ओळखून ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मदिनापासून ‘लोकमत’च्यावतीने महारक्तदान अभियान सुरू होत आहे. या अभियानात सहभाग तसेच रोटरीच्या विविध क्लबच्या अध्यक्ष, सचिव यांचा कार्यकाळ संपत असून १ जुलैपासून नवीन पदाधिकारी सूत्रे स्वीकारणार आहेत, त्यानिमित्ताने रोटरीच्या केलेल्या कामाचा आढावा व येणाऱ्या वर्षातील संकल्प या विषयी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात सोमवारी सकाळी चर्चासत्र झाले, त्या वेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी वरील निर्धार व्यक्त केला.
या वेळी रोटरी क्लब प्रेसिडेंट इन्क्ल्यू संगीता पाटील, २०२१-२२चे प्रेसिडेंट इन्क्ल्यू लक्ष्मीकांत मणियार, रोटरी क्लबचे अध्यक्ष जितेंद्र ढाके, सचिव डॉ. काजल फिरके, आगामी वर्षाचे अध्यक्ष संदीप शर्मा, सचिव मनोज जोशी, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष तुषार चित्ते, सचिव केकल पटेल, आगामी वर्षाचे अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, आगामी वर्षाचे सचिव अनुप आसावा, रोटरी सेंट्रलच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा भट-कासार, आगामी वर्षाचे अध्यक्ष राजेश चौधरी, सचिव विलास देशमुख, रोटरी गोल्ड सिटीचे अध्यक्ष विनायक बाल्दी, सचिव सुनील आडवाणी, आगामी वर्षाचे अध्यक्ष उमंग मेहता, सचिव डाॅ. नीरज अग्रवाल, रोटरी क्लब जळगाव स्टार्सचे अध्यक्ष धनराज कासट, सचिव विपूल पटेल, माजी अध्यक्ष सागर मुंदडा, आगामी वर्षाचे अध्यक्ष नीरज अग्रवाल, रोटरी रॉयलचे अध्यक्ष स्वप्नील जाखेटे, सचिव सचिन जेठवाणी,रोटरी क्लब इलाईटचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप आसोदेकर, विजय डोहळे उपस्थित होते. ‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
लोकमत व रोटरी मिळून सांभाळणार सामाजिक जबाबदारी
रोटरी क्लब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. यातील रक्तदान ही देखील एक सामाजिक जबाबदारी असून ‘लोकमत’च्या रक्तदान महाअभियानात सहभागी होऊन ही जबाबदारी पार पाडू, असे या वेळी रोटरी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकमत व रोटरी क्लबचे जुने नाते असून ‘लोकमत’च्या या सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी या महाअभियानाला रोटरीच्या सर्व क्लबचे सहकार्य राहील, अशी ग्वाहीदेखील या वेळी देण्यात आली. रक्ताची आता खरोखर गरज भासणार असून हा साठा वेळेत व पुरेसा उपलब्ध व्हावा, यासाठी सर्वांनीच रक्तदान करण्याचे आवाहनदेखील या वेळी करण्यात आले.
कोरोना काळात मोठे कार्य
रोटरी क्लबच्यावतीने कोरोनाच्या संकटात विविध क्लबच्या माध्यमातून आरोग्यविषयक व इतरही उपक्रम राबवित गरजूंना आधार दिला. केवळ आरोग्यविषयकच नव्हे तर सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थी वर्गासही मदत होईल, असे काम केले.
वर्षभरात रोटरीने केलेेले कार्य
- ३०० बेडला ऑक्सिजन पाईपलाईन
-कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जबाबदारी रोटरीने घेतली.
- ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध
-मोहाडी रुग्णालयात ८ आक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
- विद्यार्थ्यांच्या अखंडित अभ्यासासाठी शाळांच्या भिंतीवर उमटला अभ्यासक्रम
- सॅनिटायझर, मास्कविषयी जनजागृती
-कोरोनामुळे कर्ता पुरुष गेल्यानंतर सात कुुटुंबांना शिलाई मशीन वाटप, १० मशीन कामासाठी उपलब्ध करून दिल्या
-अनाथ मुलांची त्यांच्या लग्नापर्यंतची जबाबदारी स्वीकारली
- पाळधी येथे कोविड केअर सेंटर सुरू
-गरजूंना मोफत धान्य वाटप
-१०० शेतकऱ्यांना बियाणाचे वाटप
-शिवाजीनगर स्मशानभूमीचा कायापालट
-सावखेडा येथे ३०० घरांना मदत
-पाच एचआयव्हीग्रस्तांचे लग्न लावून दिले
-प्लाझ्मादान जनजागृती
-गाडेगाव येथे बंधाऱ्याचे काम करीत जलसंधारण
आगामी वर्षातील संकल्प
पर्यावरण संवर्धन, जलसंधारणाची कामे, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरविणे
-वृक्षारोपण
कोरोना प्रतिबंधक लसीकरण जनजागृती
कोरोना पश्चात आवश्यक उपाययोजना
गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे
ई-वेस्ट, प्लॅस्टिक वेस्टवर काम करणार
ग्रामीण भागातील शिक्षणावर भर
शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे
फिरते वाचनालय