लियाकत सैयद/ ऑनलाईन लोकमत
जामनेर, दि.25 - जामनेर शहर व परिसरातील 10 ते 12 ठिकाणी मोबाईलवरून चित्रिकरण करीत जामनेर येथील तरुणांनी ‘राऊडी बॉईज’ नावाचा चित्रपट तयार केला आहे. प्रत्येकी 500 रुपये वर्गणी करीत सात हजार रुपये खर्च करून दीड तासांच्या या चित्रपटाचा ट्रेलर या तरुणांनी नुकताच सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.
मोबाईल चित्रिकरणा दरम्यान चित्रपट निर्मितीचा निश्चय
जामनेर येथील रहिवासी असलेले शाहरूख शेख, शहबाज शेख व त्यांचे मित्र वर्षभरापूर्वी पहाडीबाबा दर्गा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. या दरम्यान मोबाईवर चित्रिकरण करीत असताना शाहरूख व शहबाज यांनी मित्रांसमोर चित्रपट तयार करण्याची संकल्पना मांडली. अन्य मित्रांनी देखील या संकल्पनेला होकार भरला.
प्रत्येकी 500 रुपयांची वर्गणी करीत चित्रपटाचे काम सुरु
या तरुणांनी अक्षय कुमार याची भूमिका केलेल्या ‘राऊडी राठोड’ या चित्रपटातील कथेवर आधारित ‘राऊडी बॉईज’ नावाचा चित्रपट तयार करण्याचा निश्चय केला. चित्रपटासाठी येणा:या खर्चाची माहिती काढल्यानंतर त्यांनी स्मार्ट फोनवर चित्रिकरण करण्याचा निश्चिय केला. तसेच शुटींग दरम्यान मेकअप, कपडे तसेच वाहनांसाठी पैशांची आवश्यकता असल्याने या तरुणांनी प्रत्येकी 500 रुपयांची वर्गणी जमा केली.
जामनेर शहर व परिसरात शुटींग
वर्षभरापूर्वी या तरूणांनी शुटींग सुरु केले. मोबाईवर चित्रिकरण करीत ही मुले नेमक काय करीत आहेत हा जामनेरमध्ये कुतूहलाचा विषय ठरला होता. या तरुणांनी जामनेर शहरातील वाणीगल्ली, जुना व नवीन बोदवड रोड, जळगाव रोड, आठवडे बाजार, पहाडी बाबा दर्गा, रॉयल बेकरी, लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, जामनेर रेल्वे स्टेशन या ठिकाणी शुटींग सुरु केली. संपूर्ण चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान सात हजारांचा खर्च या तरुणांनी केला. वर्षभराच्या प्रयत्नानंतर काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे काम पूर्ण करीत या तरुणांनी त्याचा ट्रेलर सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.
हिरो कंपाऊंडर, डायरेक्टरची पान टपरी तर हिरोईनचे फळाचे दुकान
चित्रपटात काम करणारे सर्वच जण 13 ते 20 वयोगटातील आहेत. 50 ते 60 तरुणांनी या चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात अक्षय कुमारची भूमिका करणारा समीर चौधरी हा एका दवाखान्यात कंपाऊंडरचे काम करतो. तर चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले शहबाज शेख व शाहरूख शेख यांची छोटी पानटपरी आहे. चित्रपटात हिरोईनचा रोल करण्यासाठी कुणी तरुणी पुढे येत नसल्याने हातगाडीवर फळविक्री करणा:या कासिम शेख याने ही भूमिका केली आहे.
यांनी केली चित्रपटात भूमिका
‘राऊडी बॉईज’ या चित्रपटात समीर चौधरी हिरो, शाहरूख व शहबाज शेख दिग्दर्शक, तौसिफ सैयद व्हीलन तर कासिम शेख या तरुणाने हिरोईनची भूमिका केली आहे. तर सहकलाकारांच्या भूमिकेत अर्षद खान, ईस्माईल कुरेशी, कासीम शेख, अकिल बेग, अजय वाणी, जुबेर शेख, अक्षय वाणी, मुक्तार शेख यांनी काम केले आहे.