‘भगदरी...’ सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील गाव. एकेकाळी या गावात राजवैभव नांदत होते. मात्र राजेशाही संपुष्टात आल्यानंतर या गावातील राजवैभवही विस्मृतीला गेले. पण सध्या राज्यात हे गाव पुन्हा चर्चेत आले आहे. कारण चार वर्षापूर्वी खुद्द राज्यपालांनीच हे गाव दत्तक घेतले आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात राज्यपालांनी तेथे भेट देऊन पाहणी केल्याने गाव भौतिक सुविधांनी चकाकले आहे.सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थान हे सर्वात मोठे संस्थानिकांचे गाव होते. या संस्थानचे कार्यक्षेत्र एक लाख २२ हजार २४७ चौरस किलोमीटर होते. याच संस्थानअंतर्गत भगदरी हेदेखील संस्थानिकांच्या वारसदारांचे गाव होते. १८४६ च्या कायद्यानुसार हे संस्थान कार्यरत होते. परंतु १९६१ मध्ये सर्वच संस्थान खालसा करण्याचा कायदा झाला. त्याद्वारे काठी संस्थानही खालसा झाले. मात्र दसरा व इतर सणाला या गावाचे राजेशाही वैभव आजही पहायला मिळते.मोलगी या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणापासून जेमतेम सात किलोमीटरवर भगदरी हे गाव. या गावाला जाण्यासाठी २१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच डांबरी रस्ता झाला. सध्या हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. परंतु राज्यपालांच्या दौऱ्यामुळे त्याची मलमपट्टी करण्यात आली आणि खड्ड्यात मुरूम-माती भरून गुळगुळीत करण्यात आला आहे. या गावात शासकीय आश्रमशाळा आहे. अंगणवाडी आहे. पशुवैद्यकीय दवाखाना आहे. आरोग्य उपकेंद्राच्या सुविधा आहेत. चार वर्षांपूर्वी गावात चांगली इमारत नव्हती. पण राज्यपालांनी दत्तक घेतल्यानंतर सर्वच शासकीय कार्यालयांच्या इमारती येथे कार्यरत झाल्या आहेत. नव्हे तर तब्बल एक कोटी रुपये खर्चाचे सांस्कृतिक भवनही बांधण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन चार दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. याठिकाणी बीएसएनएलचा टॉवरही उभारण्यात आला आहे.राज्यपालांनीच गाव दत्तक घेतल्याने सर्वच शासकीय यंत्रणा येथे कार्यान्वित झाल्याने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी गावात झाली आहे. साहजिकच सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील गावांपेक्षा हे गाव वेगळे आहे. इतर गावातील जनतेच्या नशिबी असलेल्या हालअपेष्टा, समस्या या गावात त्या तुलनेत कमी आहेत. तरीही राज्यपालांसमोरच लोकांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला. त्यात वीज आणि मोबाईल सेवेचे आश्चर्यजनक समस्या ऐकायला मिळाल्या. गावात घराघरापर्यंत वीज मीटर पोहोचले पण वीज मात्र नाही. बीएसएनएलचे लक्षवेधी टॉवर गावात प्रवेश करताच सर्वांचे लक्ष वेधते पण नेटवर्क मात्र नाही. राज्यपालदेखील या समस्या ऐकून चकीत झाले नाही तर नवल. पण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम देऊन या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.एकूणच गेल्या पाच वर्षात या गावात सांस्कृतिक भवन, पशुवैद्यकीय दवाखाना, आरोग्य उपकेंद्र या इमारतींसह परिसरातील जोडरस्त्यांच्या कामांवर १६ कोटींहून अधिक खर्च झाले आहेत.साहजिकच गावातील भौतिक विकासाची चकाकी वाढली आहे. त्यामुळे हे गाव सातपुड्यातील दुर्गम गावांपेक्षा वेगळे गाव ठरत आहे. आता या गावाचा हेवा इतर गावांनाही वाटू लागल्याने माय-बाप सरकारने या गावांकडेही लक्ष घालावे किंवा राज्यपालांनी आमचेही गाव दत्तक घ्यावे, असा सूर आसपासच्या गावातून व्यक्त होऊ लागला आहे.१९४२ साली आमच्या गावात तेव्हाचे बॉम्बे गव्हर्नर राजर लुमली व लेडी लुमली हे भगदरीला आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये आताचे राज्यपाल आले. त्यांना आम्ही तेव्हाच्या गव्हर्नरने चिप्टनसोबत काढलेला फोटो भेट दिला आहे. भगदरी हे गाव राज्यपालांनी दत्तक घेतल्यामुळे गावात रस्ते, वीज व इतर सुविधा होत आहेत. परंतु अजूनही अनेक सोयी-सुविधा गावात उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे संस्थानिकांचे वारसदार अॅड.भगतसिंग पाडवी नमूद करतात.-रमाकांत पाटील, नंदुरबार
राजेशाही वारसाला राजाश्रयाची साथ : ‘भगदरी’ बदलतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 1:08 AM