आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.३ -राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत मंगळवार, ५ डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या आदर्श गावाला भेट देणार आहेत. वनवासी क्षेत्रातील एका छोट्या पाड्याने संघटना व लोकसहभागाच्या आधारावर केलेल्या विकासाची प्रत्यक्ष पाहणी मोहन भागवत करणार आहेत. अशी माहिती रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बारीपाडा विकासातील प्रमुख कार्यकर्ते व वनवासी कल्याण देवगिरी प्रातांचे अध्यक्ष चैतराम पवार यांनी दिली.
यावेळी देवगिरी प्रातांचे अविनाश नेहते, रामानंद काळे, प्रचार प्रमुख स्वानंद झारे, महेश काळे आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बारीपाडा या गावाने गेल्या २६ वर्षात विकासाच्या अनेक योजना राबवून एक परिवर्तन घडवले आहे. या आदर्श गावाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आंतरराष्टÑीयस्तरावर देखील बारीपाड्याने घडवून आणलेल्या परिवर्तनाची दखल घेण्यात आली आहे. अनेक मान्यवरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच अभ्यासकांनी बारीपाड्याला भेटी देऊन ग्रामविकासाची प्रेरणा प्राप्त केली आहे.
ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांशी करणार चर्चाराष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भावत यांनी देखील बारीपाडा आदर्श गावाला भेट देण्याची अनेक वर्षांपासून इच्छा व्यक्त केली होती अशी माहिती चैतराम पवार यांनी दिली. त्यानुसार सरसंघचालक मंगळवारी बारीपाड्यात येत असून, सकाळी १० वाजता त्यांचे गावात आगमण होणार आहे. गावाने घडवून आणलेल्या परिवर्तनाची यशोगाथा प्रत्याक्ष ग्रामस्थांकडून ते जाणून घेणार आहे. तसेच यावेळी बारीपाडा परिसरातील काही गावांमधील नागरिकांशी देखील चर्चा करणार आहेत. बारीपाडा येथील ग्रामस्थांनी श्रमदानातुन १ हजार १०० एकर संवर्धन करून ठेवलेल्या जंगलाची पाहणी देखील डॉ.भागवत करणार आहेत. संपूर्ण दिवसभर संघचालक बारीपाडा येथे थांबणार आहेत.
सरसंघचालकांच्या भेटीने प्रेरणा मिळणारचैतराम पवार म्हणाले की, ज्या विचारधारेच्या प्रेरणेतून या सगळ्या विकासकार्याची सुरुवात झाली. त्या संघटनेच्या सर्वोच्च नेता गावाला भेट देण्यासाठी येत असल्याने ही बाब ग्रामस्थ व स्वयंसेवकांसाठी महत्वाची आहे. त्यामुळे भविष्यात आणखीन नवीन जोशाने ग्रामविकासासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. बारीपाड्याने आतापर्यंत केलेला विकासामुळे २५ वर्षांपूर्वी ज्या गावाकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हते, येथील नागरिक रोजगाराच्या शोधात बाहेर जात होते. मात्र आज परिस्थिती बदलली असून, गावाने केलेल्या जल, जंगल, आरोग्य संवर्धनाच्या जोरावर बारीपाडा सुजलाम, सुफलाम झाले आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यामातुन बारीपाड्यातील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती देखील करत आहेत. आधी पाच कि.मी.वरुन नागरिकांना पाणी आणावे लागत होते. मात्र जलसंवर्धनाच्या माध्यमातुन आज बारीपाड्यातुन पाच गावांना पाणी पुरवठा केला जात असल्याचे चैतराम पवार यांनी सांगितले. बारीपाड्याचा विकासापासून अन्य गावांनी देखील शाश्वत विकासावर भर दिला पहिजे. जल,जंगल हीच खरी संपत्ती असून, त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन देखील पवार यांनी केले.