जळगाव : वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी अर्ज प्रक्रियेची मुदत रविवारी होती. मात्र, अधिकाधिक पालकांना अर्ज करता यावेत यासाठी ही मुदत ३० मार्चपर्यंत शिक्षण विभागाने वाढविली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागांकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ३ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी अर्ज भरताना पालकांना ओटीपी येत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे पालकांच्या तक्रारीनंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबली होती. मागील आठवड्यात हा अडसर दूर झाला. प्रक्रिया थांबल्यामुळे बहुतांश पालकांना अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
३०६५ जागांसाठी आतापर्यंत ५१७९ अर्ज
आरटीई प्रवेशासाठी बुधवारपर्यंत जळगाव जिल्ह्यातून ५ हजार १७९ पालकांनी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज केले आहेत. यंदा २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे जास्तीत जास्त पालकांना याचा लाभ होणार आहे. मात्र, अधिक अर्ज येऊनसुद्धा जागा रिक्त राहण्याची परंपरा दरवर्षी पाहायला मिळते.