कथित भ्रष्टाचार प्रकरण : लोहींनी वरिष्ठांनाही सादर केला लेखी अहवाल
जळगाव : जळगाव आरटीओ कार्यालयात बीएस-४ ची २,४०० वाहने नियमबाह्य नोंदणी झाल्याच्या तक्रारीवरून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी जिल्ह्यातील सर्व वितरकांकडून खुलासे मागविले असून, याबाबतचा लेखी अहवाल धुळे व नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना बुधवारी पाठविला.
आरटीओतील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात आरटीओतील भ्रष्टाचाराबाबत दिलेल्या तक्रारीवरून चौकशी सुरू झाली आहे. जळगाव आरटीओत १२ हजार रुपये घेऊन २,४०० वाहनांची नियमबाह्य नोंदणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी नाशिक पोलिसांकडे लेखी जबाब दिल्यानंतर बुधवारी धुळे व नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाही अहवाल सादर केला. यात त्यांनी गजेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील वितरकांना लेखी विचारणा केली. बीएस-४ वाहनांची ऑनलाइन नोंदणी करताना कोणतीही अडचण उद्भवलेली नाही किंवा बेकायदेशीर पैशाची मागणी केली नाही, असे त्यांनी खुलाशात नमूद केले आहे.
वैफल्यग्रस्त मानसिकतेतून आरोप
गजानन पाटील यांनी केलेले आरोप धादांत खोटे असून, त्यांनी हे आरोप वैफल्यग्रस्त मानसिकतेतून केल्याचे दिसून येत आहे आहे. हे आरोप बिनबुडाचे व खोटे असल्याने या तक्रारीची दखल घेऊ नये, असेही लोही यांनी वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.