पोलीस अधीक्षकांकडे तक्रार : अधिकाऱ्याकडून खंडन
जळगाव : वाहनांची तपासणी करण्यासाठी बाहेर असलेल्या आरटीओच्या पथकाने मारहाण करून खिशातून पैसे काढल्याचा आरोप शरद बळीराम पाटील (रा.नांद्रा, ता. पाचोरा) यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक, एमआयडीसी पोलीस व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. वाहन निरीक्षकांनी मात्र, त्याचा इन्कार केला आहे.
२७ एप्रिल रोजी मालवाहू वाहन धरणगाव येथून डांबर प्लांटचे साहित्य घेऊन येत असताना वावडदा गावाजवळ मोटार वाहन निरीक्षक कंकरेज, वाहन चालक फारुख यांच्यासह आणखी दोन जणांनी वाहन अडविले. तुझे वाहन जमा करतो अशी दमदाटी करून मारहाण केली व खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या सर्वांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पाटील यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
दरम्यान, वाहन निरीक्षक कंकरेज यांना विचारले असता, संबंधित व्यक्तीच्या नावावर वाहन नाही, तरीदेखील त्यांनी इतर चार जणांना आणून कारवाईदरम्यान हुज्जत घातली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. खंडणी मागायला किंवा पैसे काढून घ्यायला आम्ही गुंड किंवा दरोडेखोर नाही. उलट हे वाहन सोडावे म्हणून आरटीओतीलच निवृत्त अधिकाऱ्याचा फोन आला होता, त्यांचा मान ठेवून या वाहनावर आम्ही कारवाई केली नाही, असे स्पष्ट करून कंकरेज यांनी पाटील यांच्या आरोपांचे खंडन केले.