जिल्हा बाल निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांना लस देण्याची मागणी
जळगाव : शासनाच्या विविध शासकीय कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आल्यानंतर,
जिल्हा बाल निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांनाही कोरोना लस देण्याची मागणी येथील कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. जिल्हा बाल निरीक्षण गृहात सध्या १५ ते २० कर्मचारी कार्यरत आहेत.
शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या बाहेरील कामाला वेग
जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या बाहेरील कामाला आठवडाभरापासून वेग आला आहे. जिल्हा परिषदेसमोर भीम उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, केळकर मार्केटपर्यंत खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामामुळे जिल्हा परिषदेकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना अद्यापही गर्दीच
जळगाव : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिक गावाकडे पुन्हा परतू लागले आहेत. विशेषतः उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने गावाकडे जाताना दिसून येत आहेत. मुंबईकडून जळगाव मार्गे परप्रांतात जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस,महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांना गर्दी दिसून येत आहे.
दूध फेडरेशनकडील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
जळगाव : दूध फेडरेशन परिसरात अमृतच्या कामामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती न झाल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे; तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.