यावल : तालुक्यातील अतीदुर्गम भागातील रुईखेडा या आदिवासी वस्तीवरील आदिवासी पती-पत्नीच्या खून प्रकरणी यावल पोलिसांनी एका संशयीतास ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीचे जळगाव येथील सामान्य रुग्णालयात मंगळवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़ तालुक्याच्या उत्तर सिमेवरील सातपुडा पर्वतात वसलेल्या रूईखेडा आदिवासी वस्तीवरील कलजा लक्ष्मण पावरा (वय २६) व त्याची पत्नी रिताबाई पावरा (वय २३) यांचा रविवारी जंगलात अज्ञात इसमांनी कुºहाडीने मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आल्यानंतर सोमवारी या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी शिलदार भावसिंग पावरा यास ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनानंतर दोघांच्या मानेवर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. फैजपूरचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम हिरे , फौजदार अशोक अहीरे हेडकॉन्स्टेबल पांडुरंग सपकाळे, कॉन्स्टेबल संजय तायडे, सुमीत बाविस्कर, चालक जाकीर शेख हे पुढील तपास करीत आहेत.
रुईखेडा पती-पत्नी खून प्रकरणी संशयीत ताब्यात
By admin | Published: February 08, 2017 12:27 AM