अमळनेर : नवे कपडे घेऊन न दिल्याचा राग येऊन सहा महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या तरुणीला पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे.
गेल्या दीड वर्षात गुन्ह्यांचा शोध लागत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली होती व त्यांच्या जागी जयपाल हिरे यांची नियुक्ती केली आहे. मागील गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी हिरे यांनी आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन कामाला सुरूवात केली. अमळनेर तालुक्यातील एक १७ वर्षीय तरुणी ४ डिसेंबर रोजी नवे कपडे घेण्याच्या कारणावरून आई वडिलांशी भांडली. आई वडील गावाला गेल्यानंतर ५ रोजी सकाळी २ वाजेच्या सुमारास ती घरातून निघून मंगरूळ येथे पायी आली. तेथून धुळे , नंदुरबार मार्गे उधना येथे मावशीकडे गेली होती. मावशीला घरी जाते सांगून ती सुरत खंडवा बसमध्ये बसली होती. तिला बोराडी शिरपूर येथे नातेवाईकांकडे जायचे होते मात्र ती झोपेत मध्यप्रदेशातील भिकनगाव तालुक्यातील साईखेडा या गावाला निघून गेली होती. इकडे अज्ञात व्यक्तींने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची फिर्याद अमळनेर पोलीस स्टेशनला देऊन अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेचा तपास ठप्प होता. हिरे यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याशी चर्चा करून सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील , हेडकॉन्स्टेबल नरेंद्र वारुळे यांची मदत घेत मुलीचे लोकेशन घेऊन तिचा मागोवा घेतला आणि पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे ,पोलीस नाईक योगेश महाजन यांना पाठवून मध्यप्रदेशातून मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले व सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले आहे. अल्पवयीन मुलीला काही बरेवाईट होण्याआधी परत आणून दिल्याबद्दल पालकांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.