जळगाव : कोरोनाचे अहवाल लवकर येऊन रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू व्हावे व पुढील रुग्ण बरा व्हावा यासाठी तपासण्या वाढविताना प्रयोगशाळांचीही संख्या वाढविली. मात्र एवढ्या उपाययोजना करूनही ग्रामीण भागात अद्यापही वेळेवर अहवाल येत नसल्याचे चित्र आहे. असाच अनुभव जिल्ह्यात एका कुुटुंबाला आला असून तब्बल स्वॅब देऊन सहा दिवस झाले तरी त्यांना कळविण्यात आले नाही.इतकेच नव्हे घरातील इतर सदस्य तपासणीसाठी गेले असता अॅण्टीजन कीट असतानाही त्यांना माघारी पाठविण्यात आले. विशेष म्हणजे रुग्णांना कीट नसल्याचे सांगितले जात असताना या कीट संबंधितांकडून खाजगी व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूदर पाहता याची थेट राज्यस्तरावर दखल घेतली गेली होती. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जळगावात येऊन येथील स्थितीचा आढावा घेतला.त्या वेळी मृत्यूदर कमी करणे व रुग्णांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी अहवाल २४ तासाच्या आत येण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. त्यानंतर जळगावातील कोरोना रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात आली. तसेच काही खाजगी प्रयोगशाळांशी करार करण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात अजूनही अहवाल लवकर येत नसल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार मिळावे, यासाठी तालुकापातळीवर स्वॅब घेणे व उपचार सुरू करण्यात आले. मात्र तरीदेखील या बाबत गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.सहा दिवसानंतर कळविले तिसऱ्याच व्यक्तीनेजिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी एका जणाने आपल्या दोन्ही मुलांचे २३ आॅगस्ट रोजी तपासणीसाठी स्वॅब दिले. त्यानंतर एक-दोन दिवस अहवालाची प्रतीक्षा केली. मात्र अहवाल येतच नसल्याने ते निगेटिव्ह असतील, या विचाराने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र २९ रोजी सदर व्यक्तीला आरोग्य विभाग नव्हे तर तिसºयाच व्यक्तीने संपर्क साधून तुमच्या दोन्ही मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे कळविले. त्या वेळी त्यांना धक्काच बसला. या सहा दिवसात ही मुले घरात त्यांचे आई, वडील, आजी यांच्यासह कॉलनीतील इतर जणांच्या संपर्कात आले. तसेच एवढा दिवसात मुलांना कोणतेही औषधोपचार न झाल्याने अधिकच भीती वाढली. दक्षता म्हणून संबंधितांनी घरातील सर्व सदस्य व कॉलनीतील इतर जण तपासणीसाठी गेले. त्या वेळी तेथे कीट कमी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ कॉलनीतील इतर जणांची तपासणी केली. त्यात सुदैवाने ते निगेटिव्ह आले.
ग्रामीण भागात करावी लागते अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:07 AM