मनवेल, ता. यावल : गॅसचे सिलिंडर आता जवळपास तब्बल नऊशे रुपयांत मिळू लागल्यामुळे सामान्य नागरिकांना हा महागाईचा भार सोसवेनासा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागात आता पुन्हा चुली पेटू लागल्यामुळे सरपण जमा करण्यासाठी महिलांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.
पूर्वीही चुलींचाच वापर प्रामुख्याने ग्रामीण भागात असायचा. मात्र, घरातील निघणारा धूर कमी व्हावा व महिलांना फुप्फुसाचा त्रास होऊ नये, तसेच जंगल तोड कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत घराघरात गॅस पोहोचले आहे. मात्र, आता सिलिंडररचे दर एकदमच वाढल्यामुळे अनेक घरांमध्ये गॅसचे रिकामे सिलिंडर आता रिकामेच पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गॅसचा काही दिवसच मिळाला आनंद
शासनाकडून फक्त शंभर रुपयांत गॅस कनेक्शन मिळाल्याने, काही दिवस आनंद मिळाला. आता मात्र गॅसचे सिलिंडर भरण्यासाठी नऊशे रुपये लागत असल्यामुळे महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अनेकांसाठी ही रक्कम मोठीच आहे. त्यामुळे सिलिंडर ‘शोपीस’ ठरले असून, गॅसचा आनंद काही दिवसांसाठीचाच ठरला.
ग्रामीण भागात स्थिती बिकट
ग्रामीण भागात कोविड १९ ची परिस्थिती व पावसाने दांडी मारल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. काम नाही, धंदा नाही. जेमतेम मजुरी मिळत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा तरी करावा लागत आहे. सिलिंडर भरण्यासाठी पैसा जमा करण्यांचे अशा अनेक गरिबांसमोर जणू आव्हाणच आहे. ८६० रुपयाचा सिंलेडर व ३० रुपये भाडे असे ८९० रुपयात भरलेले सिलिंडर मिळत असल्यामुळे महिला पुन्हा चुली पेटवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत शंभर रुपयात गॅस कनेक्शन मिळाले. काही दिवसांत गॅसच्या वापर करण्याची सवय पडली. दोन महिने एक सिलिंडरचा वापर होत होता. सबसिडी मिळत असल्यामुळे सिलिंडर भरणे परवड होते. मात्र, शासनाने सिलिंडर वरील सबसिडी जवळपास बंदच केल्याने, आता महागडे सिलिंडर परवड नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.
- कस्तुराबाई कोळी, शेतमजूर महिला, मनवेल.