लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांपासून ज्येष्ठ सदस्यांना मतदारांनी कौल दिला असून निवडून आलेल्या सदस्यांनी ग्रामविकासाचा निर्धार केला आहे. यात नवीन संकल्पना व आधुनिकतेची जोड देत विकास करण्याचा तरुण सदस्यांनी तर अनुभवाचा फायदा करुन घेण्याचा मनोदय या सदस्यांनी व्यक्त केला आहे. यात आव्हाणे ग्रामपंचायतच्या सिंधूबाई पंढरीनाथ पाटील या ज्येष्ठ सदस्या तर वडली ग्रामपंचायतच्या ज्योती समाधान पाटील या तरुण सदस्यांचा समावेश
तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात मोहाडी व डिकसाई ग्रामपंचायत पूर्णपणे बिनविरोध होण्यासह अनेक ग्रामपंचायतमध्ये काही सदस्य बिनविरोध ठरले. उर्वरित ग्रामपंचायतींचा निकाल मागील आठवड्यात लागला व हा निकाल पाहिला तर प्रत्येक गावामध्ये अनेक ज्येष्ठांसोबत तरुण सदस्यांनाही मतदारांनी निवडून दिल्याचे दिसून येते.
तरुण सदस्य गावाच्या विकासात मोठी भूमिका बजावतील तसेच ज्येष्ठ सदस्यांकडूनही मोठी आशा गावकऱ्यांना आहे. या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार तरुण व ज्येष्ठ सदस्यांचाही असल्याचे त्यांच्याशी झालेल्या संवादातून समोर आहे.
वडलीच्या सदस्यांचे वय केवळ २४ वर्षे
नऊ सदस्य संख्या असलेल्या वडली ग्रामपंचायतमध्ये यंदा पाच महिला सदस्या निवडून आल्या आहेत. यात कमी वयाच्या सदस्यादेखील महिलाच आहे हे विशेष. त्या म्हणजे ज्योती समाधान पाटील या २४ वर्षाच्या असून त्यांनी प्रथमच निवडणूक लढविली व त्या विजयीदेखील झाल्या. त्यांचे शिक्षण बी.एससी.पर्यंत झालेले असून या उच्च शिक्षणाचा लाभ गावविकासासाठी करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या कुुटुंबात त्यांचे सासरे जगन्नाथ पाटील हे तीन वेळा सदस्य राहिलेले आहेत.
सोसायटीनंतर आता ग्रामपंचायतमध्ये
आव्हाणे येथील ज्येष्ठ सदस्या सिंधूबाई पंढरीनाथ पाटील (६२) या पूर्वी विकास सोसायटी सदस्या राहिल्या आहेत. आता त्या ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्या असून अनुभवाचा लाभ गावाच्या विकासासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांचे पती पंढरीनाथ पाटील हे दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहेत.
निवडून आलेले एकूण सदस्य - ४८३
निवडून आलेल्या महिला सदस्या - २६१
ग्रामपंचायतींची झाली निवडणूक - ४३
———————
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मी प्रथमच उमेदवारी केली. यात मतदारांनी मला निवडून देत दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरविणार असून उच्च शिक्षणाचा लाभ गावविकासासाठी करणार आहे.
- ज्योती समाधान पाटील, ग्रामपंचायत सदस्या
या पूर्वी विकास सोसायटी सदस्य राहिले असून कुटुंबात पती दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य राहिले आहे. कुुटुंबातील या वारसासह आपल्या अनुभवाचा फायदा विकासासाठी करणार आहे.
- सिंधूबाई पंढरीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्या