जळगाव : हॉल तिकिटांच्या गोंधळामुळे २५ व २५ सप्टेंबर रोजी होणारी आरोग्य विभागाची परीक्षा शासनाने अचानक रद्द केल्यामुळे, याचा परिक्षेसाठी अर्ज केेलेल्या विद्यार्थांना चांगलाच फटका बसला आहे. अचानक रद्द करण्यात आलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थांना याचा मानसिक त्रास तर झालाच, पण दुसरीकडे ऐनवेळी तिकीटे रद्द केल्यामुळे आर्थिक फटकाही बसला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गंत गट क आणि ड प्रवर्गातील रिक्त जागांसाठी राज्य शासनातर्फे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातील विद्यार्थांनी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या विद्यार्थांची २५ व २६ सप्टेंबर असे दोन दिवस `न्यासा` या संस्थेमार्फत परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र,ऐनवेळी या संस्थेने परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविल्याने, शासनाला ही परीक्षा रद्द करावी लागली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द झाल्याचे जाहिर केल्यानंतर, काही वेळातच परिक्षार्थींच्या मोबाईलवरही मेसेज आले. त्यामुळे परिक्षेच्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत असलेले विद्यार्थी लगेच माघारी फिरले. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील क प्रवर्गातील विद्यार्थांची २५ रोजी परिक्षा असल्याने, अनेक विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळीच संबंधित परिक्षा केंद्राच्या गावांना रवाना झाले होते. तर काही जाण्याच्या तयारीत होते. मात्र, परीक्षा रद्द झाल्याचे समजताच, या विद्यार्थांनी विविध गावांची रेल्वेची काढलेली तिकीटे रद्द करण्यासाठी जळगाव स्टेशनवर एकच गर्दी केली होती.
इन्फो :
परीक्षा रद्दनंतर रद्द तिकिटांच्या भुर्दंडांचाही मनस्ताप
आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थांनी अर्ज केले होते. यात क प्रवर्गासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थांची नाशिकला परिक्षा होती. शनिवारी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान परीक्षा असल्यामुळे, अनेक विद्यार्थी जळगावहून सायंकाळच्या अमृतसर एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस व महानगरी एक्सप्रेस या पहाटेच्या गाड्यांचे तिकीट बुकींग केले होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे, या विद्यार्थांनी काढलेले तिकीटे रद्द केली. मात्र, रेल्वेच्या नियमानुसार चार्ट तयार झाल्यानंतर, तिकीट रद्द केल्यावर परतावा देण्यात येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थांना तिकीटांचा कुठलाही परतावा मिळाला नाही. तर काही विद्यार्थांनी तात्काळ तिकीटे रद्द केल्यामुळे त्यांना तिकीटाच्या रक्कमेचा निम्मा परतावा मिळाला. एकंदरीत विद्यार्थांना रद्द केलेल्या तिकिटांचा हजारोंच्या घरात फटका बसल्याने, मनस्ताप होत असल्याचे विद्यार्थांनी सांगितले.
इन्फो :
आरोग्य विभागाची नाशिकला परीक्षा असल्यामुळे, ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी सायंकाळीच रेल्वेने नाशिकला रवाना झालो होतो. मात्र, रात्री उशिरा परीक्षा रद्द झाल्याचे समजल्यावर धक्काच बसला. त्यामुळे पुन्हा माघारी फिरावे लागल्याने, मानसिक त्रास सहन करावा लागला.
विजय पाटील, परिक्षार्थी
शासनाने परीक्षा रद्द करायचीच होती, तर किमान दोन दिवस आधी कळविणे गरजेचे होते. परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थांना कळविण्यात येत असल्यामुळे, गोंधळ उडतोच. तसेच या प्रकाराचा मानसिक त्रास तर होतोच, शिवाय रेल्वेच्या रद्द केलेल्या तिकिटामागे ५० टक्के रक्कम कापण्यात आली. यामुळे आर्थिक भुर्दंडही बसला आहे.
योगेश शिंदे, परिक्षार्थी