जळगाव : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ‘येस’ बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातल्याने या बँकेचे ग्राहक धास्तावले असून बँकेच्या जळगाव शाखेत शुक्रवार सकाळपासून गर्दी वाढून ग्राहकांनी रक्कम काढण्यावर भर दिला. मात्र निर्बंधाबाबत बँकेकडून माहिती देण्यात आल्याने बहुतांश जण माघारी परतले. असे असले तरी येणाऱ्या ग्राहकांपैकी ४० टक्के ग्राहकांनी रक्कम काढली.आरबीआयने जारी केलेल्या निर्देशानुसार येस बँकेतून एका ग्राहकाना केवळ ५० हजार रुपये काढता येणार असल्याचे वृत्त ग्राहकांना समजताच शुक्रवारी सकाळी येस बँकेच्या स्वातंत्र्य चौकातील शाखेमध्ये गर्दी सुरू झाली. येथे येऊन अनेक ग्राहक आपल्या रकमेची मागणी करू लागले. मात्र बँक अधिकाऱ्यांनी ग्राहकांना माहिती देत निर्बंध सांगितले. त्या वेळी बहुतांश ग्राहक माघारी पतरल्याचे अधिकाºयांनी सांगितले.मात्र जिल्ह्यातील पतसंस्थांचा अनुभव पाहता जळगावातील ग्राहक जास्तच धास्तावले व त्यांनी रक्कम काढण्यावर भर दिली. त्यामुळे येणाºया ग्राहकांपैकी ४० टक्के ग्राहकांनी रक्कम काढली.बँकेबाहेर राजपत्ररिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधाविषय माहिती देण्यासाठी येस बँकेच्या बाहेर त्या विषयीचे राजपत्रच लावण्यात आले आहे.पोलीस बंदोबस्तबँकेजवळ ग्राहकांची गर्दी वाढू लागल्याने व अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी दक्षता म्हणून येस बँकेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणीही घाबरु नये आणि कायदा हातात घेवू नये असे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले.
जळगाव येथे येस बँकेत रक्कम काढण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 11:22 AM