Russia-Ukraine War: काहीही करा मला भारतात परत आणा, जळगावच्या सौरभची आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 05:04 PM2022-02-27T17:04:34+5:302022-02-27T17:05:22+5:30

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तो युक्रेनची राजधानी असलेल्या किव्ह शहरात अडकून पडलाय.

Russia-Ukraine War: Do anything, bring me back to India, call Saurabh of Jalgaon from ukrain | Russia-Ukraine War: काहीही करा मला भारतात परत आणा, जळगावच्या सौरभची आर्त हाक

Russia-Ukraine War: काहीही करा मला भारतात परत आणा, जळगावच्या सौरभची आर्त हाक

googlenewsNext

प्रशांत भदाणे

जळगाव- 'बॉम्बस्फोटाच्या आवाजाने कानठळ्या बसताहेत, जिवंत राहू की नाही, याची शाश्वती नाही. बाहेर कर्फ्यू असल्याने दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश लष्कराने दिलेले आहेत. त्यामुळे घराबाहेर देखील पडू शकत नाही. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. काहीही करा मला मायदेशी परत आणा' अशा शब्दांत आर्जव करत आहे जळगावकर डॉ. सौरभ विजय पाटील, हा तरुण... रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तो युक्रेनची राजधानी असलेल्या किव्ह शहरात अडकून पडलाय.

'लोकमत'नं रविवारी दुपारी त्याच्याशी व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क करत, तेथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी सौरभनं युक्रेनमध्ये अतिशय भीषण परिस्थिती असल्याचा सांगत आपल्याला मदत मिळावी, अशी विनंती केली. सौरभचं कुटुंब जळगाव शहरातील भुसावळ रस्त्यावरील कालिंका माता मंदिर परिसरातील रहिवासी आहे. सौरभ युक्रेनमध्ये फिजिओथेरपिस्टचं पदव्युत्तरचं शिक्षण घेण्यासाठी गेलेला आहे. युक्रेनमधील किव्ह येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशनमध्ये शिक्षण घेत आहे. याच दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध छेडल्याने तो अडचणीत सापडला आहे.

हॉस्टेलमध्ये उरलाय एकटा भारतीय विद्यार्थी-

लोकमतशी संवाद साधताना सौरभने सांगितलं की सध्या तो नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशनच्या होस्टेलमध्ये एकटा भारतीय विद्यार्थी उरला आहे. त्याच्या सोबत युक्रेनमधले काही विद्यार्थी मित्र राहत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने कोणालाही हॉस्टेलच्या बाहेर पडण्यास परवानगी नाही, असं त्यानं सांगितलं.

भारतीय दूतावासशी संपर्क, पण...

सौरभने मायदेशी परत येण्यासाठी युक्रेनमधील भारतीय दूतावासशी संपर्क साधला. पण सध्या तेथील युद्धजन्य परिस्थिती चिघळली असल्यामुळे शहरातून बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे आहे त्या ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर संपर्क केला जाईल, असं भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. युक्रेनच्या राजधानीचं शहर असलेल्या किव्हमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यामुळे बाहेर कोणी फिरताना दिसला तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत घराबाहेर देखील पडू शकत नाही, असंही सौरभ म्हणाला.

ऑनलाईन सर्व्हिस पण बंद-

सध्या किव्ह शहर हे भीतीच्या सावटाखाली आहे. आमच्या हॉस्टेलपासून दोन किलोमीटर अंतरावर काल रात्री रशियन आर्मीनं तुफान बॉम्बस्फोट केले. त्यामुळे कानठळ्या बसवणारे आवाज झाले. आपण जिवंत राहू की नाही अशी भीती वाटत असल्याचेही सौरभ म्हणाला. युद्धजन्य परिस्थिती असल्याने ऑनलाईन सर्व्हिस देखील बंद आहे, असंही त्यानं सांगितलं.

इकडे सौरभचे कुटुंबीय हवालदिल-

सौरभ युक्रेनमध्ये अडकून पडला आहे. त्यामुळे इकडे सौरभचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. भारत सरकारने सौरभला मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील सहा जण युक्रेनमध्ये अडकून पडल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे. या संदर्भातली माहिती राज्य आपत्ती निवारण कक्षाला कळवण्यात येत असून, ती माहिती केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यात येत आहे. त्यानंतर लवकरच या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
 

Web Title: Russia-Ukraine War: Do anything, bring me back to India, call Saurabh of Jalgaon from ukrain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.