लोकमत न्यूज नेटवर्क
वरणगाव (जि. जळगाव) : मूळ गाव फूलगाव येथील राहणारे तथा मध्य रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी जनार्दन रंभाजी पाटील यांचे सुपुत्र अजित जनार्दन पाटील यांनी २३८ विद्यार्थ्यांना युक्रेनमधील हंगेरी शहरातून मायदेशी सुखरूप परत आणण्यात मोठे योगदान दिले आहे. सध्या ते एअर इंडियामध्ये डेप्युटी चीफ एअरक्राफ्ट मेंटेनन्स (ह. मु. डोंबिवली-पूर्व) म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई येथील व्हीजेटीआय कॉलेजचे स्कॉलर विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती होती. सध्या त्यांची भारतीय सैन्यदलाच्या प्रोटोकॉलमध्ये कामगिरी सुरू असल्यामुळे त्यांच्या काही नातलगांनी याबाबत सखोल माहिती देण्यास नकार दिला. तरीसुद्धा फूलगाव येथील युवराज कुरकुरे यांनी सांगितले की, सुरुवातीला युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता तेथे विमान घेऊन जायला कुणी तयार होत नव्हते. परंतु फूलगावसारख्या सैनिकाच्या गावात जन्मलेले अजित पाटील यांनी सर्वप्रथम तेथे जाण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या चमूने तेथील विद्यार्थ्यांना दूतावासाच्या साहाय्याने हंगेरीजवळील छोट्याशा विमानतळावर बोलावून घेतले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना येताना खूप त्रास झाला. सर्व २३८ विद्यार्थी चालत व जसे जमेल तसे जीव मुठीत घेऊन गोळा झाले होते. त्यांची अवस्था वाघाच्या तावडीत सापडलेल्या पाडसासारखी झाली होती. त्यांच्या डोळ्यासमोर ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ या उक्तीप्रमाणे जणू मरणच घिरट्या घालत होते. जेव्हा ते सर्व विद्यार्थी विमानात सुखरूप बसले, तेव्हा त्यांच्या जिवात जीव आला व त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, असा अनुभव अजित पाटील यांनी सांगितला. तसेच एकट्याचा हा खेळ नसून त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांशिवाय हे शक्य झाले नाही, असेसुद्धा ते म्हणाले. ३० वर्षांपासून ते सेवेत आहेत. त्यांच्या या साहसी शौर्याबद्दल जय हिंद ग्रुप, भुसावळ तसेच नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.