विजयकुमार सैतवाल
जळगाव- रशिया व युक्रेन यांच्या युद्धाच्या झळा अधिक तीव्र होऊन सुवर्ण बाजारात दिवसेंदिवस तेजी येत आहे. सोमवार, ७ मार्च रोजी तर सोन्याच्या भावात एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ते थेट ५३ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. अशाच प्रकारे चांदीच्याही भावात सोमवारी दोन हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती ७१ हजार ७०० रुपये प्रति किलोवर पोहचली. रशिया व युक्रेन यांच्यातील तणावामुळे गेल्या महिन्यापासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यात आता दोन आठवड्यापासून तर अधिकच वाढ होत असून सोमवारी तर सोने-चांदी उच्चांकीवर पोहचले.
नऊ दिवसात तीन हजाराने वधारले सोने
सोन्यातील भाववाढ पाहिली तर नऊ दिवसात सोने तीन हजार रुपये प्रति तोळ्याने वधारले आहे. २६ फेब्रुवारी सोने ५० हजार ७०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात २८ फेब्रुवारी रोजी ८०० रुपयांची वाढ होऊन ते ५१ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर २ मार्च रोजी पुन्हा ७०० रुपयांची वाढ झाली व सोने ५२ हजार २०० रुपये प्रति तोळा झाले. तीन दिवस याच भावावर राहिल्यानंतर सोमवार, ७ मार्च रोजी त्यात थेट एक हजार ५०० रुपयांची वाढ झाली व सोने ५३ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
नऊ दिवसात चांदी ६२०० रुपयांनी वधारली
सोन्या प्रमाणे चांदीच्याही भावात वाढ सुरू आहे. नऊ दिवसात तर चांदी सहा हजार २०० रुपयांनी वधारली आहे. २६ फेब्रुवारी रोजी ६५ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात २८ फेब्रुवारी रोजी एक हजाराने वाढ होऊन ती ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. त्यानंतर २ मार्च रोजी दोन हजाराने वाढ होऊन ती ६८ हजार ५०० रुपये झाली. ४ रोजी त्यात पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ६९ हजार रुपये प्रति किलो झाली. सोमवार, ७ मार्च रोजी तर दोन हजार ७०० रुपयांची वाढ होऊन चांदी ७१ हजार ७०० रुपये प्रति किलो झाली.
पावणे दोन वर्षानंतर सोने पुन्हा ५४ हजारांपर्यंत
कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर लॉकडाऊन काळातही सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्या वेळी जुलै ते ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५५ हजारावर पोहचले होते. त्यानंतर मात्र ते कमी-कमी होत गेले. आता पुन्हा युद्धामुळे सोने ५४ हजाराच्या जवळ पोहचले आहे. तसेच त्या वेळी चांदी ७७ हजारावर पोहचली होती. आता ती पुन्हा ७१ हजारांच्या पुढे गेली आहे.