लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य परिवहन महामंडळामध्ये २०१९ साली भरती झालेल्या चालक-वाहक प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण कोरोनामुळे अर्ध्यावरच थांबविण्यात आले. त्यामुळे वर्षभरापासून हे उमेदवार घरी बसून आहेत. कोरोनामुळे प्रशिक्षण थांबले अन् नोकरीही लटकल्यामुळे सध्यातरी या उमेदवारांचे भवितव्य अधांतरीच आहे. त्यामुळे जळगाव विभागात पात्र ठरलेल्या १७१ उमेदवारांना आता महामंडळाच्या सेवेत पुन्हा नियुक्त करण्यासाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा लागून आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे ७ हजार ९४२ चालक-वाहक पदांसाठी सन २०१९मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर चालक आणि वाहकांच्या प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात आली. यामध्ये प्रशिक्षण पूर्ण झालेल्या काहींना नियुक्ती मिळाली तर काहींचे प्रशिक्षण कोरोनामुळे अर्धवट राहिले आहे. तसेच नियुक्ती दिलेल्या काहींना पुन्हा कमी करण्यात आले. त्यामुळे महामंडळाच्या सेवेत पात्र ठरूनही हे उमेदवार गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून बेरोजगार आहेत. या उमेदवारांना महामंडळाकडून कुठलेही वेतन वा कुठल्याही सवलती मिळत नसल्यामुळे, मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
इन्फो
कोरोनामुळे लटकले प्रशिक्षण
कोरोना काळात महामंडळाची सेवा ठप्प झाल्याने महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे नव्हते. यामुळे लॉकडाऊनमध्ये दर महिन्याला एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. एकीकडे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नसताना, प्रशिक्षणार्थी उमेदवारांना वेतन कुठून देणार, या कारणास्तव महामंडळाने या उमेदवारांचे प्रशिक्षणच स्थगित केले आहे.
इन्फो
२ हजार २०० जणांनी केले होते अर्ज
-१७१ जणांची झाली होती निवड
- १७१ जणांचे प्रशिक्षण अपूर्ण
-१७१ जणांचे प्रशिक्षण अर्धवट राहिले
इन्फो :
तर लगेच प्रशिक्षणार्थीं उमेदवारांना सेवेत घेणार
जळगाव विभागातील राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत पात्र ठरलेल्या चालक-वाहक प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या प्रशिक्षणाला कोरोनामुळे महामंडळाच्या सूचनेनुसार स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना सेवेत घेण्याबाबत जळगाव विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. महामंडळाचे जसे आदेश येतील, तसे या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना सेवेत घेण्यात येईल, अशी माहिती कामगार अधिकारी प्रशांत महाजन यांनी दिली.
इन्फो :
कोरोना काळात प्रशिक्षण स्थगित करण्यात आलेल्या उमेदवारांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत, त्या उमेदवारांच्या मागण्यांचे निवेदन महामंडळाकडे पाठवले आहे. जसे महामंडळाकडून या उमेदवारांना सेवेत घेण्याबाबत आदेश येतील, तसे वरिष्ठांच्या सूचनेनुसार या उमेदवारांना सेवेत घेण्यात येईल.
दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी, जळगाव विभाग.