जळगाव - क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्या बॉडीगार्डने बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जामनेर येथील राहत्या घरी सर्व्हीस रिव्हॉल्वर ने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रकाश गोविंदा कापडे (वय ३९ रा. गणपती नगर, जामनेर) असे मयताचे नाव आहे. प्रकाश कापडे हे गेल्या १५ वर्षांपासून एसआरपीएफ जवान म्हणून तो मुंबई पोलिस येथे नोकरीला होते. काही दिवसांपुर्वी प्रकाश कापडे हे जामनेरला मुंबई येथून सुट्टीवर आले होते. ते जामनेर येथील गणपती नगरात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी अशा परिवारासह राहत होते. गेल्या सहा महिन्यांपासून सचिन तेंडुलकर यांच्याकडे बॉडीगार्डचे ते काम पाहत होते. चार दिवसांपूर्वी मतदानाकरिता ते जामनेर शहरात आले होते. दोन दिवसांपूर्वी ते परिवारासह शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते.
सर्व्हीस रिव्हॉल्वर ने घातली गोळीमंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्व कुंटूंबातले सर्वजण झोपले असताना, रात्री १.३० वाजता प्रकाश कापडे हे घराच्या वरच्या बाजूला असलेल्या खोलीत गेले. त्या ठिकाणी कपाळाला सर्व्हीस रिव्हॉल्वरन गोळी झाडून आत्महत्या केली. बंदुकीचा आवाज झाल्यावर त्यांची आई आणि परिवार धावत आला. मात्र, ते जागेवरच कोसळले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. प्रकाश कापडे यांच्या सर्व्हीस रिव्हॉल्वरमध्ये दहा गोळ्या होत्या. त्यातील दोन गोळ्या फायर झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
बड्या सेलीब्रेटींकडे बॉडीगार्ड म्हणून केले काम
२००९ मध्ये महाराष्ट्र राखीव दलात भरती झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या सेलीब्रेटींकडे बॉडीगार्डची जबाबदारी देण्यात आली. आदित्य ठाकरे, नारायण राणे, छगण भुजबळ, सलमान खान यांच्याकडेही प्रकाश कापडे यांनी काम केले. गेल्या चार महिन्यांपासून सचिन तेंडूलकर यांच्याकडे बॉडीगार्डची जबाबदारी देण्यात आली होती. चार दिवसांची सुट्टी संपणार असल्याने, बुधवारी सकाळी ८ वाजता ते मुंबईला जाणार होते. मात्र, त्यापुर्वीच त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.