जळगाव : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा कोरोना नियमांचे पालन करीत २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी पटसंख्या, शिक्षकांची तपासणी आणि बाधितांचे अहवाल ही माहिती नियमित ऑनलाइन पाठविणे बंधनकारक असताना सुरुवातीचे केवळ दोनच दिवस याचा आढावा घेण्यात आला. नंतर मात्र, नियमित ते शक्य नसल्याचे सांगत आता टप्प्याटप्प्याने ही माहिती घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात २० हजारांवर शिक्षक असून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होण्याच्या महिनाभराआधीच त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला केवळ आरटीपीसीआर चाचण्यांना परवानगी होती. मात्र, नंतर वेळ नको म्हणून अँटिजन चाचण्यांना व ज्यांना लक्षणे असतील अशाच शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी झाल्यानंतर ७ डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान पाचवीच्या शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची पुन्हा चाचणी करण्याचा निर्णय झाला, मात्र, यातील काही शिक्षकांची आधी चाचणी झाल्याचे सांगत काहीच शिक्षकांची चाचणी करण्यात आली. यात सुरुवातीला दोन शिक्षक बाधित आढळून आले होते. शाळांमध्ये कोरोनाचा धोका नको म्हणून नियमित सर्व माहिती ऑनलाइन अपलोड करण्याच्या शाळांना सूचना देण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यात सुरू झालेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा : २०५८
सुरुवातीचे दोन दिवस सर्व शाळांनी पाठविली माहिती
या आहेत अडचणी
नियमित सर्व आढावा घेणे शक्य नसून शाळांना ते नियमित पाठविणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला शिक्षकांच्या चाचण्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक पातळ्यांवर बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शिक्षकांना लक्षणे जाणवतात ते तपासणी करून घेत आहेत. त्यामुळे नियमित माहिती न घेता काही दिवसांनी एकत्रित आढावा घेण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन असल्याची माहिती आहे.
कोट
प्रत्येक शाळांना गुगल शिट दिलेले आहे. सुरुवातीचे काही दिवस शाळांनी माहिती पाठविली. सर्व सुरळीत असल्याने शिवाय शिक्षकांच्या चाचण्या झालेल्या असल्याने आता नियमित ही माहिती पाठविली जात नाही. ती टप्प्याटप्प्याने घेण्याचे नियोजन आहे.
-भाऊसाहेब अकलाडे, शिक्षणाधिकारी, जळगाव.