कुंदन पाटील
जळगाव : घरच्या उंबरठ्याला कधी श्रीमंती शिवलीच नाही. मात्र मनातल्या आनंदाने कधी थिरकत्या पावलांनाही रोखले नाही. म्हणूनच सर्वसामान्य कुटूंबातील दोघा लेकरांच्या प्रेमात मराठमोळा रसिक पडला आहे.जळगावकर लेकरांच्या ‘सुवर्ण’ पावलांनी नृत्यदरबारी यशाचा जागर सुरुच ठेवला आणि दिव्येश आणि सागराच्या मनसोक्त थिरकण्याच्या कसरतीने दोघांना अंतिम फेरीत नेऊन ठेवले आहे.
एका वृत्तवाहिनीवरच्या नृत्य स्पर्धेतील सागर दिलीप वरपे आणि दिव्येश दिनेश भादवेलकर यांची यशोगाथा. सागर हा महाराणा प्रताप विद्यालयात आठवीत तर दिव्येश गोदावरी विद्यालयातील सहावीत शिकणारा.जन्मजातच दोघांच्या रक्तातच नृत्य भिनलेले. मात्र घरच्या परिस्थितीसमोर हतबल झालेले. सागरचे वडील नाभिक तर आई घरोघरी भांडी धुते.
दिव्येशचे वडील एका खासगी कंपनीत तर आई महिलांना दुचाकी शिकवते. नृत्याच्या दरबारात सागर आणि दिव्येशला ‘भगवान’ पावला. अर्थातच भगवान पाटील या प्रशिक्षकाच्या माध्यमातून त्यांनी नृत्याविष्कार घडवायला सुरुवात केली. दोघांच्या सामुहिक नृत्याला मराठमोळा आबपणाची किनार जुळलेलीच होती. म्हणून त्यांनी स्पर्धेतही ‘पावनखिंड’ लढवली...‘पावनखिंड’मधील गाण्यावर. ‘एकीकडे शार्याचे सूर आणि दुसरीकडे दोघांच्या कसरतीने नूर’ असाच तो नृत्याविष्कार. म्हणूनच दोघांच्याही थिरकरणाऱ्या पावलांनी एका वाहिनीवरच्या स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. पुढच्या महिन्यात दोघेही अंतिम फेरीच्या कसोटीला उतरण्यासाठी ते भगवान पाटील यांच्या माध्यमातून सराव करताहेत. क्षणाक्षणाला कसरतीपूर्ण नृत्य साकारण्यासाठी दोघेही रात्रोंदिवस जीव ओतताहेत. ‘मी होणार सुपरस्टार’साठी...सुवर्णनगरीतल्या विजयीगाथेत तोरा रोवण्यासाठी.
‘बालविश्व’मुळे गवसले आकाश
सागर आणि दिव्येशचा सराव कुठे घ्यायचा, हा प्रश्न भगवान पाटील यांना सतावत गेला. तेव्हा बालविश्व विद्यालयाच्या भारती चौधरी आणि संदीप चौधरी यांनी शाळेचा हॉल उपलब्ध करुन दिला. सराव करताना या शाळेने यंत्रणाही उभी करुन दिली आणि वेळोवेळी लागणारा खर्चही पुरविला. म्हणून भगवान पाटीलच म्हणतात...‘बालविश्व’मुळे सागर आणि दिव्येशचे आकाश यशाने भरुन आले आहे. अगदी आनंद आभाळासारखेच....म्हणून तर दोघांसाठी मीही जीव ओततोय....