जिजाबराव वाघ / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १९ - भाषिक, प्रांतिक अस्मिता टोकदार होत असताना परप्रांतीयांविरुद्ध स्थानिकांचे होणारे वादही माणुसकी हरवत चाललीयं का..? असा थेट प्रश्न उपस्थित करतात. याला समर्पक उत्तर चाळीसगाव येथील आ.बं.विद्यालयाच्या (मुलींचे) शिक्षकांनी नेपाळच्या रुपालालचे सात्वंन करून दिले आहे. शिक्षकांनी रुपालालच्या आईच्या निधनानंतर त्याला ‘दुखवटा’ घेऊन माणुसकीच्या फुलांच्या दरवळाला कोणत्याही सीमा आणि बंधने नसतात, हेच सिद्ध केले आहे.४५ वर्षीय रुपालाल करणसिंग राजपूत हे मुळचे नेपाळवासीय. रुकुम जिल्ह्यातील झुलखेत हा त्यांचा तालुका. याच तालुक्यातील दीडशे उंब-यांच्या ‘होल’ गावात त्यांची तीन भावंड आणि आई - वडील शेती करुन गुजराण करतात. रुपालाल हे गेल्या काही वषार्पासून चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या आ.बं. विद्यालयात सुरक्षा रक्षक (गुरखा) म्हणून काम करतात. त्यांचा विवाह झाला असून त्यांना तेजस आणि सीमा अशी दोन अपत्ये आहेत.आईचे अंतिम दर्शनही नाहीरुपालाल यांची आई कलीबाई यांचे वयाच्या ७५व्या वर्षी नेपाळमध्ये गावी जानेवारीमध्ये अपघाती निधन झाले. त्याचवेळी नेपाळमध्ये स्वतंत्र राजधानी मागणीचे आंदोलनही पेटले होते. रुपालाल हे आईच्या अंत्यसंस्कारासाठी गावी जाण्यासाठी निघालेही. मात्र गोरखपूर पर्यंतच ते पोहचू शकले. पुढे नेपाळ आणि भारत सीमेवर तणावाची स्थिती असल्याने त्यांना माघारी निघावे लागले. रुपालाल यांनी सीमेवरुनच भरल्या डोळ््यांनी आईला शेवटचा निरोप दिला. त्यांच्या तिघा भावांनी आईला रुपालाल यांच्या अनुपस्थितीत मुखाग्नी दिला. वडील करणसिंग राजपूत हे ८० वर्षीय असून आजारामुळे अंथरुणाला खिळून आहेत.शिक्षक झाले सगेसोयरेरुपालाल यांचे महाराष्ट्रात कुठेही नातेवाईक नाहीत. आईच्या निधन आणि अंत्यसंस्कारावेळी आपण उपस्थितीत राहू न शकल्याचे शल्य त्यांना आजही आहेच. आ.ब. (मुलींचे) विद्यालयातील शिक्षकांनादेखील रुपालाल यांची दर्दभरी कहानी हलवून गेली. २१ शिक्षकांनी एकत्र येऊन त्यांना दुखवटा घेण्याचा निर्णय घेतला.अन् अश्रुंची झाली फुलेसोमवारी सकाळी शाळेची घंटा वाजली. रुपालाल नेहमी प्रमाणे कामे करीत होते. शिक्षकांनी त्यांचे शाळेच्या आवारातील घर गाठले. त्यांचे सात्वंन करताना त्यांच्यासाठी आणलेला दुखवटा (ड्रेस, पत्नीसाठी साडी, मुलांसाठी कपडे) त्यांच्या ओंजळ हातांवर ठेवले. डोक्यात गांधी टोपी घालून खांद्यावर बागायती रुमाल ठेवत त्यांना मिठी मारली, धीरही दिला. शिक्षकांची आपुलकी आणि माणुसकी पाहून रुपालाल आणि त्यांच्या पत्नी गीता यांचे डोळे भरुन आले. सहावीत शिकणारा तेजस आणि बालक मंदिरात शिकणारी चिमुरडी सीमा आई - वडिलांच्या डोळ्यातून वाहणा-या अश्रुंची झालेली फुले पाहून आनंदून गेली होती.रुपालाल हे गेल्या काही वषार्पासून शाळेत असल्याने सर्व शिक्षकांशी त्यांचे कौटुंबिक रुणानुबंध जुळले आहेत. हाच स्नेहाचा धागा त्यांचे दु:ख हलके करणारा ठरला. आम्ही त्यांचे सगेसोयरे होऊन सात्वंन केले. शाळा या संस्कार रुजवतात. याचाच हा खरोखरीचा धडा आहे.-दिनेश महाजन, शिक्षक , आ.बं. (मुलींचे) विद्यालय, चाळीसगावआई गेल्याचे दु:ख आभाळाएवढे आहे. ही पोकळ कधीही भरुन निघणारी नाही, हेही खरेच. मला आईचे अंतिम दर्शनदेखील घेता आले नाही. सीमेवरचा तणाव नाती तोडतो. शिक्षकांनी मात्र मला दुखवटा घेऊन माणुसकीचे नवे नाते जोडले.- रुपालाल राजपूत, सुरक्षा रक्षक, चाळीसगाव शिक्षण संस्था
नेपाळमध्ये आईचे अंत्यदर्शनही घेऊ न शकलेल्या सुरक्षा रक्षकाचे शिक्षकच झाले सगेसोयरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:25 PM
चाळीसगावच्या शिक्षकांनीच घेतला दुखवटा
ठळक मुद्देमाणुसकीचा पाझरआईच्या निधनानंतर जावू शकले नाही नेपाळला