जळगाव : पाण्याअभावी यंदा कापूस व मका पिक हातातून गेले आहे. काम नसल्याने मुलं गाव सोडून जात आहेत. पिण्याला पाणी नाही, गुरांना चारा नाही. बोंडअळीची भरपाई नाही, कर्जमाफीचे पैसे नाहीत, अशात कसे जगावे, हेच कळत नाही, अशी व्यथा दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीसमोर शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या या व्यथा ऐकून केंद्रीय पथकही निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय, प्रश्न आजही कायम आहे.
दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी तुम्ही, चारा का लावत नाहीत. असा प्रश्न केला. त्यावर चाऱ्यासाठी पाणी द्या, असे शेतकऱ्यांनी सांगताच समितीचे सदस्य निरुत्तर झाले. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती बुधवारी सायंकाळी पिंपळगांव गोलाईत (ता.जामनेर) येथे पोहोचली. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. या पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी. देशपांडे, सहसचिव छवी झा, डिपार्टमेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए.के. तिवारी, एमएनसीएफसीच्या सहाय्यक संचालक डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश आहे. दरम्यान, समितीच्या सदस्यांनी पिंपळगाव गोलाईत गावाजवळील कमल आत्माराम पाटील, मंगला पांडुरंग पाटील व शेखर चिंधू पाटील यांच्या शेतातील पिकांची पाहणी करुन माहिती घेतली.