मुक्ताईनगर : मंदिरात साधेपणाने होणार कार्यक्रम
मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई ७२४ वा तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा यंदा वैशाख कृष्ण दशमी, शुक्रवार, ४ जून रोजी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मुक्ताई मंदिरात प्रतिनिधी स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्याचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण होणार आहे. भाविकांनी या माध्यमातून घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
संत मुक्ताबाई विजेच्या प्रचंड कडकडाटात वैशाख कृष्ण दशमीदिनी अंतर्धान झाल्या. परंपरेनुसार दरवर्षी वैशाख दशमीला संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर मुक्ताबाई समाधी सोहळा साजरा होतो. यावर्षीची दशमी तिथी ४ जून रोजी आहे. ५ जून रोजी अहोरात्र एकादशी वृद्धी तिथी व ६ जून रोजीसुद्धा एकादशी तिथी अशी दोन दिवस आलेली आहे. त्यामुळे वारी व उपवासाची एकादशी ६ जून, रविवार रोजी करावयाची आहे.
एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी अशी वारकरी भाविकांची भावना असते. परंतु, यंदा अनेक वर्षांत अशी परिस्थिती निर्माण झाल्याने श्रीसंत मुक्ताबाई समाधी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळींशी विचारविनिमय करून ४ जून रोजी ७२४ वा संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा साजरा करण्याचे ठरले आहे.
संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथे यंदाही प्रातिनिधिक स्वरूपात ४ जून रोजीच समाधी सोहळा साजरा करण्यात येईल आणि कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या घरी राहूनच अंतर्धान सोहळा साजरा करावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केले आहे.