अमळनेर : येथे सुरू असलेल्या संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी अतिशय श्रवणीय कीर्तन सादर केल्याने भाविक तल्लीन झाले.यावेळी प. पू. संत प्रसाद महाराज, विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘कंठी धरला कृष्णमनी अवघा जणी प्रकाश । काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम ।। ’ या अभंगावर अतिशय सुंदर विवेचन सादर करत देगलूरकर महाराज यांनी अमळनेर आणि देगलूरकर यांच्या ऋणानुबंध याबाबत भाविकांना भावनिक साद घातली. तत्पूर्वी सकाळी सखाराम बावन्नीचा पाठ व विष्णुसहस्र नामाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या निघालेल्या ग्रंथदिंडीत सुमारे ५ हजार भाविक डोक्यावर ग्रंथ घेऊन सहभागी झाले. काल्याचा महाप्रसाद स्वत: प्रसाद महाराज यांनी भाविकांना वाटप केला. महाराजांनी स्वत: दही हंडी फोडून काल्यामध्ये दही व लाह्या मिसळून तयार झालेला काला हा प्रसाद म्हणून वाटप केला. सुमारे १५ हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सुमारे ९ दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात राबलेले सर्व कार्यकर्ते, भाविक, आणि भक्ताच्या परिश्रमाचे सार्थक झाल्याचे यावेळी प्रसाद महाराज यांनी सांगितले. या सर्वांचा वाडी संस्थान तर्फे सत्कार करण्यात आला व आभार व्यक्त करण्यात आले.
संत सखाराम महाराज द्विशताब्दी महोत्सवाची उत्साहात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 6:21 PM