परिसरात युवा कार्यकर्त्यांकडून वृक्षारोपण
शिरसोली : येथून जवळच असलेल्या नागझिरी शिवारातील पुरातन पाचदेवी मंदिर परिसरात येथील युवा कार्यकर्त्यांकडून ऑक्सिजन पार्क निर्माण केला जात असून या ठिकाणी वृक्षारोपण करून सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांसमोर एक नवीन अदर्श निर्माण केला आहे. यामुळे त्यांचे ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे.
शिरसोली येथून दोन कि.मी. अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी एक पुरातन पाचदेवी मंदिर आहे. या मंदिरात दूरवरून भाविक येऊन देवीचे दर्शन घेऊन मानलेले नवस फेडत असतात. या मंदिर परिसरात विवाह सोहळ्याचेही आयोजन केले जात असते. परंतु या मंदिराचा परिसर नेहमीच उपेक्षित राहिला आहे. येथे अनेक भाविक दर्शनासाठी येत असले तरी त्यांना येथील गैरसोयीचा सामना करावा लागत असे. हीच अडचण लक्षात घेत येथील युवा तरुण व मंदिराचे देखरेख करणारे कार्यकर्ते यांनी ग्रामस्थांना पाचदेवी परिसरात वृक्षारोपण व संरक्षक जाळी व सोयी-सुविधांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी आर्थिक मदत केली. त्याच पैशातून युवकांनी मंदिराच्या अवतीभवती तारेचे कुंपण करून याच परिसरात नारळ, लिंब, उंबर, बेल, वड, पिंपळ अशी दोनशे सात वृक्षांच्या रोपाची लागवड केली. या वेळी नंदलाल काटोले, शिवदास बारी, राजू अस्वार (गाडगे), तुषार अस्वार, सोनू बारी, कैलास ताडे, नाना खलसे (टेलर), नीलेश भारुडे यांच्यासह अनेक जण हजर होते.
-----------------------
पुरातन पाचदेवी मंदिरासाठी एक एकर जागा शिरसोलीचे ग्रामस्थ भागवत साहेबराव पाटील यांनी दिली, तर या ठिकाणी दोनशे सात वृक्षांची रोपे बारी समाज शाळेचे शिक्षक सुरेश बारी यांनी दिली.
----------------