वासेफ पटेलभुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी नयना पाटील मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करीत असताना ‘कोरोना’ची लागण झाली. विश्वासाच्या बळावर ‘कोरोना’ला हरवून गावी आली असता तिचा जल्लोषात सन्मान करण्यात आला.नयना पाटील मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून गेल्या चार वर्षांपासून सेवा करीत आहे. मुंबई येथे झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. रुग्णांच्या उपचारासाठी नायर हॉस्पिटललाही कोरोना डेडिकेट करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून औषधीच्या माध्यमातून कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करीत असताना, बाधा होण्याची दाट शक्यता असल्याची आधीच कल्पना होती. मात्र बाधितांना सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य यासाठी जराही न डगमगता नयनाने अविरत सेवा सुरू ठेवली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्रास जाणवू लागल्याने स्वत:हून स्वॅब दिला. अहवाल पॉझिटिव्ह आला. यावेळी मात्र मन विचलित झाले. मात्र स्वत:तल्या आत्मविश्वासाला ढळू दिले नाही. मानसिकदृष्ट्या स्वत:ला धीर दिला. आपण यावर नक्की मात करू व नायर येथे उपचार केल्यानंतर पूर्णत: बरी झाली. उपचार घेत असताना सोबतच्या रुग्णांना हिंमत व बळ दिले. वेळोवेळी रुग्णांना विविध व्यायाम करण्याचे सांगितले व स्वत: केले. कोरोनाला साकेगावच्या कन्येने हरवून लढाई जिंकली.मुंबईला होती एकटीनयनाचे पती केनिया येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. आई-वडील साकेगाव येथे राहतात. मुंबईला एकटी राहून कर्तव्य पार पाडत होती. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई येथील हॉटेल ताजमध्ये त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळ कोणीही हिंमत द्यायला नसताना मित्र-मैत्रिणी व स्टाफच्या सहकाऱ्यांनी धीर व आधार दिला. स्वत:मध्ये आत्मविश्वास जागवून नक्कीच आपण लढाई जिंकू, ही मनाशी गाठ बांधली होती. याचा सकारात्मक परिणाम झाला. आज पूर्णत: बरी होऊन ती साकेगावला परतली आहे.गावी आली असता जि. प.सदस्य रवींद्र पाटील, माजी उपसरपंच विनोद पवार, प्रमोद पाटील, अमृत पवार, राजेंद्र पवार, चंद्रकांत पवार यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी तिने केलेल्या कोरोना रुग्णांच्या सेवेचा अभिमान बाळगून व कोरोनाला हरवून गावी परत आल्यानंतर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
साकेगावच्या कन्येने हरविले कोरोनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 2:51 PM
विश्वासाच्या बळावर ‘कोरोना’ला हरवून गावी आली असता तिचा जल्लोषात सन्मान करण्यात आला.
ठळक मुद्देनायर हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांची सेवा करत असताना झाली होती लागणस्वत:च्या गावी साकेगाव येथे झाला सन्मानमुंबईला होती एकटी