जळगाव : ठेवीदारांच्या ठेवी बुडवून संचालक मंडळ व अवसायकांनी स्वत:च्या तुंबड्या भरुन ठेवीदारांचा विश्वासघात केल्याचे प्रकरण चर्चेत असताना संस्थेने नियम डावलून मोठे नाव असलेल्यांना कर्जाची खिरापत वाटली. त्यातही त्यांनी ठरवून दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केलीच नाही, त्यामुळे ठेवीदारांना त्याचाही मोठा फटका बसला. सीआयडीला सादर झालेल्या फॉरेन्सीक फ्रॉड डिटेक्शन ऑडिट रिपोर्टमध्ये थकीत कर्जदार व त्यांच्याकडे असलेल्या रकमेचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
या रिपोर्टनुसार, संस्थेने पोटनियमांचा भंग करुन संचालकांनी असुरक्षित, विनातारण कॅश क्रेडीट, टर्म व वाहन कर्ज वाटप केलेले आहे. हा अहवाल तयार होईपर्यंत बेकायदेशीररित्या कर्ज घेतलेल्या व थकीत असलेल्या कर्जदारांची यादीच या अहवालात देण्यात आलेली आहे. दरम्यान, संस्थेच्या नियमानुसार २० एप्रिल २००४ पर्यंत असुरक्षित कर्ज ३० हजारापर्यंत देण्याचा संस्थेला अधिकार होता तर सुरक्षित कर्ज दीड लाखापर्यंतच देण्याचा अधिकार होता. पोटनियमानुसार सभासद नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला कर्ज देण्याचा अधिकार नव्हता. ३१ ऑगस्ट २००७ पासून संस्थेला असुरक्षित कर्ज देण्याची मर्यादा ५० हजार होती तर सुरक्षित व मालमत्ता सुरक्षेबाबत ५० लाखापर्यंत मर्यादा होती.
२५१ पानांचा फॉरेन्सिक अहवाल
सीआयडीने लेखापरिक्षकाकडून केलेला फॉरेन्सीक फ्रॉड डिटेक्शन ऑडिट रिपोर्ट हा २५१ पानांचा असून ५ भागांमध्ये ५ प्रकरणे यात सविस्तर मांडण्यात आलेले आहेत. संस्थेच्या १९ व्या वार्षिक अहवालानुसार संस्थेचे २४ हजार १५८ सभासद होते तर नाममात्र सभासदाची संख्या १ लाख ४४ हजार ६८९ इतकी होती. शेअर कॅपिटल १५ कोटी ७२ लाख ६५ हजार होते. सहकारी संस्थांचे (लेखापरिक्षक) सहायक निबंधक राजेश जाधवर यांनी लेखापरिक्षण करुन ५ एप्रिल २०१४ रोजी शासनाला अहवाल सादर केलेला आहे. अहवालातील आक्षेपानुसार संस्थेत झालेल्या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांनी मुदतठेवीच्या रकमा काढण्यासाठी संस्थेकडे रिघ लागली होती. त्यामुळे ३ जून २०१४ रोजी संस्थेच्या सर्व शाखा बंद करण्यात आल्या. जानेवारी २०१५ मध्ये संचालक मंडळाविरुध्द गुन्हा दाखल झाला. २ फेब्रुवारी रोजी संचालकांना अटक झाली. २७ ऑक्टोबर २०१५ रोजी केंद्रीय सहकार निबंधकांनी अवसायक म्हणून जितेंद्र कंडारेची नियुक्ती केली. ७ नोव्हेंबर २०१५ रोजी कंडारेने पदभार स्विकारला. ३ फेब्रुवारी २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत संस्थेचे कामकाज ट्रस्टी व कर्मचाऱ्यांमार्फत सुरु होते.
असे आहेत मोठे थकीत कर्जदार (सीआयडीच्या फॉरेन्सिक अहवालात यांना थकीत दाखविण्यात आले आहे.)
कर्जदार कर्जाची रक्कम थकीत रक्कम कर्ज दिल्याची तारीख
चंदूभाई पटेल २ कोटी २,७८,४८, ५६७ २३ एप्रिल २०१४
धरम सांखला दीड कोटी ९४,९,०९४ २९ नोव्हेंबर २०१३
ललीत विजय कोल्हे २५ लाख १२,४९,०२० १२ जुलै २००५
सिंधू विजय कोल्हे ५ लाख १६,६३,२९५ १२ नोव्हेंबर २००६
विवेक देविदास ठाकरे ३ लाख १०,३७,६६६ २७ जानेवारी २००९
ॲड.रवींद्र प्रल्हाद पाटील २० लाख १५,६३,४५२ २१ नोव्हेंबर २०११
ॲड.रवींद्र प्रल्हाद पाटील १० लाख ६, ०७,३८८ १३ एप्रिल २०१२
संदीप रवींद्र पाटील १० लाख १०,१५,०२१ ४ ऑक्टोबर २०११
संदीप रवींद्र पाटील ५ लाख ०५,६१,८०६ २ फेब्रुवारी २०१३
अभिषेक शांताराम पाटील ६० लाख ५०,८५,००० २९ जानेवारी २०१४
मनीष अविनाश पात्रीकर ६ लाख १५,८२,४२७ २४ ऑक्टोबर २०१३