लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सालार नगरला भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, यासाठी परिसरातील नागरिक रियाज बागवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि नहीचे प्रकल्प अभियंता चंद्रकांत सिन्हा यांची भेट घेतली. त्यात दुसऱ्या टप्प्यात तेथे भुयारी मार्ग बनवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर सध्या तेथे एक लहान बोगदा सुरू करून देणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.
नाल्यावरील पुलाच्या बाजूला नवीन पूल त्वरित बांधण्यात येईल. यामुळे, पुलाची रुंदी वाढल्याने अपघात कमी होतील. नव्या या बोगद्याची लांबी चौपदरी महामार्गाइतकी असेल. रुंदी ५ मीटर आणि उंची ३ मीटर असेल. बोगद्यात जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी समांतर रस्ते तयार केले जातील. अपघाताच्या ठिकाणी गतिरोधक असतील, असे आश्वासनदेखील देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात रियाज बागवान, अली अंजुम रजवी, शाहिद सैयद, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जिया बागवान, रिजवान जहागीरदार, सानेर सैयद, अक्रम देशमुख, ॲड. इम्रान साहिल उपस्थित होते.