कलाशिक्षक विशेष शिक्षक असल्याने ‘ती’ श्रेणी अतिरिक्त ठरले तरी लागू राहणार
रावेर : अर्थशास्त्र विषयात पदवीधर असलेल्या शिक्षकाला इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ‘अर्थशास्त्र’ विषय शिकवण्यासाठी नसल्याने शिकवणारा शिक्षक अन्य विषय शिकवण्यासाठी सक्षम नसल्याने प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाच्या पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ असा विषय नसलेल्या पदवीधर शिक्षकांना देता येत नसल्याचा निर्वाळा देत उलटपक्षी कलाशिक्षक हा विशेष शिक्षक असल्याने तो पदविका वा पदवीधर शिक्षकांत अतिरिक्त ठरत असला तरी पदवीधर प्रशिक्षित शिक्षकाच्या वेतनअनुदानासाठी पात्र ठरत असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १७ जुलै रोजी पारीत केला आहे.
रावेर तालुक्यातील रायपूर येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयातील महेंद्रकुमार तायडे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळताना हा निर्णय दिला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील रायपूर येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक महेंद्रकुमार शालिग्राम तायडे यांनी सन १९९६ ला अर्थशास्त्र विषयात बी.ए. पदवी घेऊन व बी.एड.च्या अंतिम वर्षात अर्थशास्त्र विषयात शिक्षणशास्त्राची पदवी संपादन केली आहे. त्या शैक्षणिक पात्रतेवर डी.एड. वेतनश्रेणीच्या उपशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, याच शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक इच्छाराम पाटील यांना बी.एड. वेतनश्रेणीचे फायदे मिळत होते. म्हणून त्यांच्या जागेवरील प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाची बी.एड. वेतनश्रेणी मिळण्यासाठी त्यांनी संस्थेकडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचेकडे मागणी केली होती. परंतु त्यांना बी.एड. वेतनश्रेणी देता येत नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी नाकारल्याने महेंद्रकुमार तायडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यांना सेवानिवृत्त शिक्षक इच्छाराम पाटील यांच्या रिक्त जागेवरील प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाची वेतनश्रेणी लागू करून कलाशिक्षक संजय धनसिंग सोनवणे यांना मंजूर केलेल्या वेतन अनुदानाचे आदेश रद्दबातल करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी उच्च न्यायालयाच्या याचिकेत करून शिक्षणाधिकारी, संस्थाध्यक्ष, व कलाशिक्षक यांना प्रतिवादी केले होते. त्या अनुषंगाने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या न्या. रवींद्र घुगे व न्या. एस.जी. मेहरे यांच्या खंडपीठाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत, संस्था तथा शिक्षणाधिकारी यांनी शालेय अभ्यासक्रमात अध्यापनासाठी विषय नसलेल्या अर्थशास्त्र विषयातील पदवीधर शिक्षक नियुक्त करताना चूक केली असेल वा अनावश्यक लांगुलचालन करत असतील तर ती चूक न्यायालय करू शकत नाही. याचिकाकर्ते शिक्षकाची शैक्षणिक पात्रता अर्थशास्त्र विषयात असल्याने व तो विषयच इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नसल्याने आणि विद्यार्थी संख्या कमी झाल्याने सेवानिवृत्त शिक्षकाची रिक्त झालेली जागा ही आपोआपच संपुष्टात आली असल्याने याचिकाकर्त्याला प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाची वेतनश्रेणी देता येणार नसल्याचा निकाल देताना याचिका खारिज केली. तसेच न्यायालयाने कलाशिक्षक संजय सोनवणे यांचे पद विशेष शिक्षक म्हणून स्वतंत्र पद असल्याने, त्यांना माध्यमिक शाळेसाठी असलेला २५ टक्केचे गुणोत्तर प्रमाण लागू होत नाही. ते विशेष शिक्षक असल्यामुळे ते माध्यमिक शाळा संहिता कलम ६६ नुसार कला शिक्षक यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदवीधर शिक्षकांत अतिरिक्त ठरत असले तरी, त्यांचा कार्यभार पाहता त्यांना विशेष शिक्षक म्हणून प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाच्या वेतनश्रेणीसाठी पात्र धरावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय पारीत केला आहे. या खटल्यात याचिकाकर्ते वादीतर्फे ॲड. अझीझोद्दीन आर. सय्यद, सरकारतर्फे ॲड. एस.बी. पुलकुंडवार, प्रतिवादीतर्फे ॲड. ए. जे. पाटील व ॲड. व्ही. जे. सालगरे यांनी काम पाहिले.