जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा पगार हा राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावा, असा ठराव सर्वानुमते सोमवारी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या तिमाही ऑनलाइन बैठकीत झाला.
जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील सोनार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. राष्ट्रीयीकृत बँकेतून पगारदार सभासदांचे जोखीम व विमा संरक्षण स्वीकारले जाते. सोबत अनेक फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. याउलट जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पगार होत असल्यामुळे आकस्मिक घटनेची जोखीम तथा विमा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेतून पगार व्हावा, असा सर्वानुमते ठराव करण्यात आला. त्यासोबतच थकीत वैद्यकीय बिलाच्या बाबतीत शासनाने तत्काळ अनुदान उपलब्ध करून द्यावे, घोषित-अघोषित केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांना २० टक्के अनुदानाचा टप्पा देऊन तत्काळ अनुदानावर आणावे व निर्णयाची अंमलबजावणी करावी, अन्यथा अनुदानित तत्त्वावर काम करणारे शिक्षक, प्राध्यापकदेखील उच्च माध्यमिक परीक्षेवर बहिष्कार टाकतील, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
लघुत्तरी प्रश्नावर जास्त भर द्यावा
ज्या शिक्षकांची मान्यता आहे, अशा शिक्षकांना शालार्थ क्रमांक तत्काळ उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर २०१३ ते २०२० पर्यंत मान्यताप्राप्त झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे थकीत वेतन तत्काळ अदा करावे. कोरोना संकटात शैक्षणिक वर्ष पूर्णत: ठप्प झाले आहे. केवळ ऑनलाइन अभ्यासक्रम प्रक्रिया राबवली जात आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही फारसे घेता आले नाही़ त्यामुळे बारावीची परीक्षा ऑनलाइन तथा ऑफलाइन घेत असताना लघुत्तरी प्रश्नावर जास्त भर द्यावा. ५० टक्के अभ्यासक्रमावरच प्रश्नपत्रिका काढण्यात यावी, विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी या धोरणाचा अवलंब करावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
यांचा होता सहभाग
संघटनेच्या बैठकीत सचिव शैलेश राणे व ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांच्यासह प्रा. डी. डी. पाटील, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र तायडे, प्रा. पी. पी. पाटील, प्रा. संजय पाटील, प्रा. राजेश बडगुजर, प्रा. जी. एच. वंजारी, प्रा. शरद पाटील, प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. अतुल इंगळे, प्रा. राजेश भटनागर, सहसचिव प्रा. डी. डी. भोसले, प्रा. राजेंद्र चव्हाण, प्रा. शैलेश पाटील, प्रा. सुधाकर गोसावी, प्रा. बी. एस. बोरसे, आर. आर. उपाध्ये, संदीप पाटील, अरुण राठोड, संजय चौधरी, संदीप पाटील, देवेंद्र वानखेडे, धनराज भारुडे, एस. झेड. पाटील, किरण कुलकर्णी, नरेंद्र गायकवाड, अनिल सोनवणे, स्मिता जयकर, रेखा पवार, मनीषा देशमुख, भारती महाजन व राजेश अंजाळे, मनोज वारके उपस्थित होते. आभार नंदन वळींकार यांनी मानले.