लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे पगार हे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून सीएमपी प्रणालीद्वारे व्हावे, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आमदार पटोले हे खान्देश दौऱ्यावर असताना गोदावरी महाविद्यालयाच्या प्रांगणात संघटनेकडून त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्या प्राध्यापकांनी प्रॉव्हिडंट फंड वैद्यकीय कारणासाठी कर्जरूपाने काढायचा असेल अशांना तो मिळत नाही, यासाठी शासनाने ती वेबसाईट लवकर सुरु करावी, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे. यासह विविध मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष या नात्याने लक्ष घालून राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे हे प्रश्न मांडावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. आठ विविध समस्यांबाबत यावेळी कनिष्ठ प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सचिव प्रा शैलेश राणे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, प्रा.प्रशांत वंजारी, विनाअनुदानित कृती समितीचे प्रा. अनिल परदेशी आदी उपस्थित होते.