लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडित आवश्यक वस्तुंच्या दुकानांना योग्य व्यवस्थापन करून दिवसभर सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री करून न विकलेला माल फेकून आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आंदोलकांनी निवेदन दिले.
सकाळी ११ ते दीड वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. कोरोनाचे निर्बंध पाळत पाच ते सहा आंदोलनकांनी भाजीपाला आणून सोशल डिस्टन्सिंग पाळून तो विकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक बसले होते. राज्यभर विविध ठिकाणी हे आंदेालन करण्यात आले. अमजद रंगरेज यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव विजय सुरवाडे, शहर सचिव खुशाल सोनवणे, शहर उपाध्यक्ष रियाज पटेल, सुकलाल पेंढारकर, रहीम तांबोळी यांनी भाजीपाला विक्री केला तर सुलतान शेख, शहराध्यक्ष इरफान शेख , देवानंद निकम, सुभाष सोनवणे यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
या आहेत मागण्या
खते, बियाणे जुन्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, बोगस बी बियाणे व भेसळयुक्त रासायनिक खते विक्री किंवा कृत्रिम तुटवटा निर्माण करुन चढ्या दराने विक्री करणाऱ्या व्यापा-यांचे परवाने रद्द करावेत, नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश बॅंकांना द्यावेत, केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, अशा मागण्या करण्यात आल्या असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तातडीने या मागण्या शासनदरबारी पोहचविणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.