चोपडा,दि.७- गुर्जर समाजातील चालीरितींना फाटा देत, लग्नपत्रिका न छापता एकाच दिवशी साखर पुडा, हळद आणि लग्न सोहळा असे सर्व धार्मिक विधी उरकत, समाजात आदर्श विवाह रविवारी पार पडला.
चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथील अशोक अमृत चौधरी यांचा मुलगा उमेश अशोक चौधरी यांचा विवाह मंगरूळ (ता.चोपडा) येथील रहिवासी व चोसाकाचे सेवा निवृत्त कर्मचारी भरत डोंगर पाटील यांची कन्या कविता पाटील हिच्याशी ठरला होता. दोन्ही कुटुंबाची परिस्थिती साधारणच आहे. दोन्ही कुटुंबातील प्रमुखांना गुर्जर एकता अभियानचे प्रमुख डॉ. राहुल पाटील, डॉ. तृप्ती पाटील, पंकज पाटील, एस. एच. पाटील, कांतीलाल पाटील, रमाकांत चौधरी, निलेश पाटील यांनी लग्न समारंभात होणारा खर्च, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रबोधन केले. त्यामुळे शिरपाव पद्धत टाळून जुन्या पद्धतीला तिलांजली देऊन सर्व विधी करण्यास दोन्ही परिवार तयार झाले. आज ७ मे रोजी महावीर अग्रसेन भवनात सर्वप्रथम साखरपुडा, नंतर वधु-वराला हळद लावण्याचा कार्यक्रम आणि नंतर बोहल्यावर चढवून नवरदेव नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार टाकून साधेपणाने लग्न सोहळा आटोपला. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबाने लग्नपत्रिका छापल्या नाहीत. जवळच्या नातेवाईकांना फक्त भ्रमणध्वनीवरून सोहळ्याचा निरोप देण्यात आला होता. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व धार्मिक विधी उरकण्यात आले.