ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17 - डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू व चिकुनगुनिया सारख्या आजारांमुळे शहरात कधी नव्हे एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने याप्रश्नी अगोदर चर्चा व्हावी या भाजपा सदस्यांच्या मागणीवरून महासभेत गदारोळ झाला. विषय पत्रिकेवरील विषयानंतर सविस्तर चर्चा करू असे आश्वासन दिल्यावरही या सदस्यांनी घोषणाबाजी करत व्यासपीठासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी व भाजपा सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. सभेचे विषय संपल्यानंतर रोगराईवर चर्चा झाली. भाजपाच्या नगरसेविका सुचिता हाडा यांच्या नेतृत्वाखाली रोगराई नियंत्रणासाठी समिती स्थापन करण्याचा ठराव एकमताने झाला. मनपाची महासभा महापौर ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपमहापौर गणेश सोनवणे, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, नगर सचिव अनिल वानखेडे आदी होते. सभेच्या प्रारंभीच भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे यांनी उभे राहून शहरात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया सारख्या आजारांचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला असल्याने या प्रश्नी अगोदर चर्चा व्हावी अशी मागणी केली. सभागृहातील सदस्यांची नावे घेऊन त्याच्या घरातही डेंग्यूचे रूग्ण असल्याचे ते म्हणाले. याप्रश्नी सभेच्या शेवटी चर्चा करू असे महापौर ललित कोल्हे यांनी सांगितले मात्र चर्चा अगोदरच व्हावी या मुद्यावरून भाजपाच्या सदस्यांची उभे राहून घोषणाबाजी सुरू केली. तरीही सभेचे कामकाज सुरू राहिल्याने या सदस्यांनी व्यासपीठाच्या समोर खाली बसून घोषणाबाजी सुरू केली. महापौर ललित कोल्हे, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर हे रस्त्यावर उतरून कामे करत आहेत पण कर्मचारी वर्ग काम करत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याची भूमिका विरोधकांच्यावतीने सुचिता हाडा यांनी मांडली. ठेके दिले तेथे व मनपा कर्मचारी आहेत तेथेही तीच परिस्थिती आहे. अनेक तक्रारी केल्या की एका तक्रारीची दखल घेतली जाते. शहरात दोन्ही आमदारांच्या प}ी, सभागृहातील सदस्य, त्यांची मुले डेंग्यूने आजारी होते. केवळ एक दोन व्यक्ती सक्षम असून चालत नाही तर सर्वानी बरोबर येऊन कामे करणे गरजेचे आहे.