नशिराबाद : गावाचा वाढता विस्तार व गेल्या दोन वर्षांपासून इमारती अभावी रखडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्र दोनसाठी जिल्हा परिषद विभागातून सुमारे एक कोटी ५८ लाख ८३ हजार रुपयांचा दुमजली इमारती बांधकामाला निधी मिळाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
नशिराबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोबतच मुक्तेश्वरनगर व ख्वॉजानगर या परिसरात उपकेंद्राची आवश्यकता आहे. मात्र निधी व इमारती अभावी उपकेंद्राचा प्रस्ताव प्रलंबित होता मात्र या संदर्भात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पाठपुरावा करून दुमजली इमारतीसाठी एक कोटी ५८ लाख ८३ हजार रुपयांचा निधीस मंजुरी मिळवली आहे. मुक्तेश्वरनगर, ख्वॉजानगर या परिसरापासून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रापर्यंत नागरिकांना उपचारासाठी येणे लांब ठरत होते. महामार्ग ओलांडून आरोग्य उपचारार्थ जावे लागत होते. त्यामुळे मुक्तेश्वर नगर, ख्वॉजा व ताजनगर परिसरामध्ये उपकेंद्र दोन उभारणीचे नियोजन करण्यात आले. असल्याची माहिती जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. गावात खालची आळी परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र एक आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी उपकेंद्र दोन ची निर्मिती करण्यात येत आहे.