लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या निविदेत शहरातील राहून गेलेल्या १६५ कॉलन्यांचा समावेश मनपाने नव्याने केला आहे. तसेच या भागांमध्येही या योजनेतंर्गत पाणी मिळावे यासाठी ३० कोटी रुपयांच्या निधीला शुक्रवारी महासभेने मंजुरी दिली आहे. लवकरच या कामासाठी निविदा काढून १६५ कॉलन्यांमध्ये अमृत अंतर्गत योजनेच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. ८५ विषय असलेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी अवघ्या तीन तासाच्या आत ७५ विषयांना मंजुरी देत, सभा आटोपती घेतली. त्यात ऑनलाईनच्या गोंधळामुळे महासभेत भराभर विषयांना मंजुरी देत सभा आटोपती घेण्यात आली.
महासभेत एकूण ८५ विषय ठेवण्यात आले होते. मनपाच्या स्थापनेपासून झालेल्या कोणत्याही महासभेत इतके विषय कधीही ठेवण्यात आले नव्हते. मात्र, सत्ताधाऱ्यांना अनेक विषयांवर चर्चा न करता, केवळ अजेंड्यावरील प्रस्तावांचे क्रमांक सांगत ७५ विषयांना मंजुरी दिली. त्यात सर्वाधिक विषय हे बांधकाम विभागाशी संबधित असून, दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत तब्बल २५ कोटींच्या निधीच्या खर्चाला देखील महासभेने मंजुरी दिली आहे. दरम्यान, शहराच्या वाढीव भागातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या निधीला महासभेने मंजुरी दिली. अमृत योजना मंजूर झाल्यानंतर अनेक भागातील नागरिकांकडून वाढीव भागात देखील ही योजना मंजुर करण्याची मागणी केली जात होती.
रस्त्यांच्या कामांसाठी ६८ कोटी निधीचा ठराव
सप्टेंबर महिन्यात सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांचा कामासाठी मनपा फंडातून ४२ कोटींचा निधीचा ठराव केला होता. या निधीतून होणाऱ्या कामांचे अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात असतानाच सत्ताधाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात केलेला ठराव रद्द करून, या निधीत २६ कोटींची भर टाकून नव्याने ६८ कोटींच्या कामांचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. आता पुन्हा शहरातील नवीन ऱस्त्यांच्या कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु होणार आहे.
जे.के.डेव्हलपर्सकडून वसुल होणार ३ कोटी ?
मनपा मालकी असलेल्या शिवाजी उद्यानातील जागा जे.के.डेव्हलपर्सला भाडे तत्वावर देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यावर या जागेचा ताबा जे.के.डेव्हलपर्सने सोडला नाही. त्यात मनपाने ८१ ब ची नोटीस देखील बजावली. मात्र, जागा न सोडल्याने ही जागा दोन दिवसात ताब्यात घेवून, जे.के.डेव्हलपर्सवर रेडिरेकनरच्या दरानुसार आजच्या भाड्याचा दरानुसार ३ कोटी रुपयांची वसुली व नुकसानभरपाई करण्यात यावी अशी मागणी ॲड.शुचिता हाडा यांनी केली. तसेच ही जागा ताब्यात घेण्याचा प्रस्तावाला देखील मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येत्या दोन दिवसात ही जागा मनपाकडून ताब्यात घेण्यात येणार आहे.
बांधकामबाबत आलेल्या सर्व विषयांना एका झटक्यात मिळाली मंजुरी
महापौर व उपमहापौरांच्या कार्यकाळातील ही सभा अखेरची राहणार असल्याने महासभेत एकूण ८५ विषय ठेवण्यात आले. यामध्ये बांधकाम विभागाशी संबधित अनेक विषयांचा समावेश होता. दलित वस्ती सुधार, नगरोथ्थान, जिल्हा नियोजन समिती, मनपा फंड, जिल्हा वार्षिक नाविण्यपुर्ण योजना अशा विविध माध्यमातून नगरसेवकांनी सुमारे २५ कोटींच्या कामांना महासभेकडून मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही विषयांवर महासभेत साधी चर्चा देखील घेण्यात आली नाही.
या विषयांवरही झाली चर्चा
१. एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांनी ममता हॉस्पिटलजवळ प्रवेशव्दार उभारून त्यास मेहरुणनिसा असे नाव देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मेहरूणचे नाव बदलण्याचा घाट असल्याचे सांगत नामंजूर केला. यावरून शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी सत्ताधाऱ्यांचा भूमिकेचा निषेध केला.
२. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल असे नाव देण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. कालंका माता चौकाचे ‘लेवा पाटीदार’ चौक असे नामकरण करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.
३. राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या ४२ कोटींच्या निधीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत व दाद मागण्यासाठीचे अधिकार
सभागृहातील सदस्यांना प्रदान करण्याबाबत ॲड.शुचिता हाडा यांनी प्रस्तावाला देखील महासभेने मंजुरी दिली.