ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.11- तालुक्यातील खेडी खुर्द येथे शनिवारी संध्याकाळी साडे सहा वाजता भरवस्तीत वाळूच्या पैशावरुन तलवार व लोखंडी रॉडने मारहाण करुन 4 लाख 47 हजार 500 रुपये लुटून नेण्यात आले. यात वाळू ठेकेदाराचा मुलगा यश सुनील मंत्री व त्याचा कार चालक दीपक रामदास ओतारी (दोन्ही रा.जळगाव) हे जखमी झाले आहेत. या थरारक घटनेमुळे वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, हल्लेखोर कन्हैय्या उर्फ अशोक नामदेव सोनवणे (रा.खेडी खुर्द) व शंकर ठाकरे (रा.जळगाव) या दोघांविरुध्द तालुका पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना रात्री 12 वाजता चित्रा चौकातून पकडण्यात आले.
फुपनगरी येथे विलास काळू यशवंते (रा.जळगाव) यांनी वाळूचा ठेका घेतला आहे. त्यात सुनील मंत्री यांचीही भागीदारी आहे. वाळू विक्रीतून गोळा होणारी रक्कम घेण्यासाठी यश सुनील मंत्री व चालक दीपक रामदास ओतारी (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे कारने (एम.एच.19 सी.डी.9990) ठेक्यावर गेले होते. तेथून परत येत असताना खेडी खुर्द येथे कन्हैय्या सोनवणे याच्या घरासमोरच पांढ:या रंगाची कार (एम.एच.15 बी.डी.3717) मंत्री याच्या कारच्या पुढे आडवी लावली. तलवार व लोखंडी रॉड हातात घेवून कारमधून उतरलेल्या दोघांनी मंत्री यांच्या कारच्या काचा फोडून दोघांवर हल्ला केला व रोकड असलेली सीटवर ठेवलेली बॅग घेवून कारने पळाले.
शेतात फसली कार
भरधाव वेगाने जाणारी कार गावाच्या बाहेर एका शेतात फसली. पकडले जाण्याच्या भीतीने या दोघांनी जळगाव शहरातून एका जणाला दुचाकी घेवून बोलावले. त्याच्या दुचाकीवर बसून तिघं जण पुन्हा जळगाव शहराच्या दिशेने फरार झाले. या घटनेची गावभर चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत यश मंत्री यांच्याकडून हकीकत जाणून घेतली. त्यानंतर मंत्री यांची कार व हल्लेखोरांची शेतात फसलेली कार पोलीस स्टेशनला आणली.