बोदवड : भरधाव डंपरने धडक दिल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना साळशिंगी गावाजवळ घडली. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली.येथील भुसावळ रस्त्यावरील साळशिंगी गावा दरम्यान बोदवड पासून दोन किमी अंतरावर जामनेर तालुक्यातील नेरी येथील शांताराम हरी इंधाटे हे आपला सहा वर्षीय नातू हर्षल गजानन इंधाटे यास साळशिंगी, ता. बोदवड येथे आजारी आजीच्या भेटीला दुचाकी ने घेऊन जात असताना बोदवड पासून दोन किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्यासाठी दुचाकीउभी करून आडोश्याला गेले व दुचाकी जवळ नातू हर्षल हा उभा असताना काही कळण्याच्या आतच बोदवडहून भुसावळकडे भरधाव वेगाने जाणारे विना क्रमांकाच्या डंपरने उभ्या दुचाकी गाडीला जोरदार धडक दिली.त्या अपघातात दुचाकी जवळ उभा असलेला हर्षल डंपरच्या चाकाखाली आला. त्यात त्याच्या डोक्याचा भाग पूर्णपणे बाहेर पडला व तो जागीच ठार झाला. सदरचा प्रकार आजूबाजूच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी पाहताच घटना स्थळी धाव घेत डंपर अडवून चालकास चोपले.सदर घटना साळशिंगी गावात पसरताच गावात सुपडू चौधरी या बालकांच्या मामाने गावकऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले व सदरचे विदारक चित्र पाहत अश्रूंना वाट मोकळी केली.दरम्यान शहरात अनेक ठिकाणी अवैध वाळूचा ढिग लागला असून गत आठवड्यातच ‘लोकमत’ने अवैध वाळू वाहतुकीचे वृत्तही प्रसारित केले होते. मात्र हवी तशी कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
वाळूच्या डंपरने बालकास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 5:37 PM