कोरोना काळातही भडगाव, घोडदे गिरणा नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरने दररोज अवैधरीत्या वाळूचा उपसा होताना दिसत आहे. भडगाव, पेठ व घोडदे गिरणा नदीच्या पात्रात वाळूउपसा होत असल्याने नदीच्या पात्रात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. दररोज रात्री जुन्या पिंपळगाव रस्त्याने व रस्त्यावरील मधल्या मार्गाने आयटीआय मागून गॅस गोडाउन, ग्रामीण रुग्णालय यांसह छुप्या मार्गाने अवैधरीत्या ट्रॅक्टरने वाळूची सर्रास वाहतूक होताना दिसत आहे.
जुन्या पिंपळगाव रस्त्याची वाहनांमुळे अतिशय दयनीय अवस्था होताना दिसत आहे. पावसाळा असल्याने रस्त्यात ट्रॅक्टरचे चाक चिखलात रुतत असल्याने रस्त्याचे तीनतेरा होत आहेत. शेतकऱ्यांना बैलगाडे, मोटारसायकली आदी वाहने चालविणे जिकरीचे ठरत आहेत. शेतकरी व शेतमजुरांना या रस्त्यावर पायी चालणेही त्रासाचे होत आहे. शेतीमाल वाहतुकीलाही त्रासाचे ठरत आहे. या रस्त्यालगत भडगाव शहरापासून अडीच ते तीन किमी अंतरावर घोडदे देवस्थान आहे. या देवस्थानावर भाविक नेहमी दर्शनासाठी जात असतात. रस्ता खराब असल्याने भाविकांनाही वापरणे मोठ्या त्रासाचे ठरताना दिसत आहे.
पावसाळा सुरू असल्याने त्यात हा रस्ता कुठे खडी, तर बहुतांश रस्ता मातीचा आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होत आहे. रस्त्यात खोल खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हेच समजत नाही. या रस्त्यावर गॅस गोडाउन रस्त्याच्या कोपऱ्यावर सिमेंट मोरीचे बांधकाम करण्यात आले आहे. या मोरीचे कामही संबंधित ठेकेदाराने थातूरमातूर केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या मोरीजवळ मातीचा भरावही पूर्णपणे केलेला दिसत नाही. या मोरीतून पावसाचे पूर्ण पाणी न जाता मोरीला लागूनच खोलगट जुन्या नाल्याच्या भागात रस्त्यावर पाणी साचत आहे.
या मोरी भागाच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. या मोरीचे बांधकाम चुकीच्या ठिकाणी व निकृष्ट झाल्याची चर्चा आहे. या मोरीजवळील खोलगट भागात व रस्त्यावरील खड्ड्यात ठिकठिकाणी तात्पुरता मुरुम टाकावा, अशी मागणीही जोर धरीत आहे. भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागून जाणारा हा जुना पिंपळगाव बुद्रुक रस्ता नेहमी वापराचा आहे.
===Photopath===
290621\29jal_4_29062021_12.jpg
===Caption===
भडगाव ते जुन्या पिंपळगाव रस्त्यावर साचलेला वाळूचा ढीग व खराब रस्ता.