अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नेहमीचा अनधिकृत वाळू उपसा, पात्रात वाढत जाणारी जलपर्णी व शेतीसाठी होत असलेले अतिक्रमण यामुळे गिरणा नदी आपले अस्तित्व हरवत जात आहे. मात्र, गिरणा नदीचे होत असलेल्या या वाताहतीकडे प्रशासन, पर्यावरणवादी संघटनांचेही दुर्लक्ष होत आहे. वाळू उपसा अशाच प्रकारे सुरू राहिल्यास येत्या १० ते १२ वर्षांमध्ये नदीपात्रात केवळ जलपर्णी व खडकाव्यतिरिक्त काहीही शिल्लक राहणार नाही अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
कधीकाळी पावसाळ्यात असो वा हिवाळ्यात नेहमी वाहणारी गिरणा नदी आज आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. वाळू माफियांनी ज्याप्रकारे गिरणा नदीला गेल्या काही वर्षांत ओरबाडणे सुरू केले आहे. त्यामुळे सध्या बांभोरी, भोकणी, निमखेडी व आव्हाणे शिवारात गिरणा पात्रात वाळूपेक्षा खडक लागायला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी नदीपात्रातून वाळूच शिल्लक नसल्याने जलपर्णी सारख्या वनस्पती वाढत आहे. प्रशासनाने जर गिरणा नदी वाचविण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात गिरणा नदीचे रूपांतर एका नाल्यात झालेले पहायला मिळू शकते.
गिरणेचे अस्तित्व नष्ट होण्याचे कारणे
१. गिरणा पात्रात होत असलेला बेसुमार वाळू उपसा.
२. पात्रात वाढत जाणाऱ्या जलपर्णी व वेडी बाभूळसारख्या वनस्पतींचे प्रमाण.
३. शेतीसाठी गिरणा पात्रात होत असलेले अतिक्रमण.
४. जळगाव शहरासह परिसरातील सांडपाणी व कंपन्यांचे दूषित पाणी थेट पात्रात जात आहे.
यामुळे होणारे परिणाम
१. गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सुमारे पाच लाख नागरिकांना बसणार फटका.
२. सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या लागवडीवर होणार परिणाम.
३. सध्या उन्हाळ्यात गिरणा काठालगतच्या अनेक गावांमधील बोअरवेल पडतात बंद.
४. गिरणेतील जैवविविधतेवर होतेय परिणाम, गिरणा पात्रात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होतेय घट.
लक्ष देणाऱ्यांची भूमिका
१. लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी गिरणेतील अनधिकृत वाळू उपस्यावर बोलायला तयार नाही. सगळ्याच पक्षातील लोकप्रतिनिधी आपापल्या पक्षातील वाळू व्यवसायात उतरलेल्या कार्यकर्त्यांना पोसण्यात मश्गुल आहेत.
२. जिल्हा प्रशासन महसूल जमा करण्यात व्यस्त.
लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नसताना, प्रशासनदेखील वाळू लिलाव करून महसूल वसूल करण्यात व्यस्त आहे. अनधिकृत वाळू उपसा होत असताना त्याठिकाणी काही मोजक्याच तलाठी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्यांच्या निश्चित झालेल्या हप्तेखोरीमुळे गिरणेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
सुरत रेल्वेपुलाचे खांब ही पडले उघडे
सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग दरम्यान गिरणा नदीवर दोन पूल आहेत. त्यापैकी जुन्या पुलाचे खांब अनेक वर्षांपूर्वीच प्रचंड वाळू उपस्यामुळे मूळ जागेपेक्षा एक ते दोन फुटांपर्यंत खाली गेले आहेत, तर आता नवीन पुलाचे खांबदेखील वाळू उपस्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहेत. अशाचप्रकारे वाळू उपसा कायम राहिल्यास भविष्यात हा पूलदेखील धोकेदायक ठरण्याची शक्यता आहे.