साने गुरुजी स्मृतीदिन
संजय पाटील
अमळनेर : जगाला मानवता व प्रेमाचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींच्या आंतरभारती केंद्राच्या बांधकामाची गती निधीअभावी रखडली आहे. तर दुसरीकडे राजकीय आणि शासकीय अनास्थादेखील वाढत आहे. त्यामुळे हे केंद्र होणार की नाही, असा प्रश्न साने गुरुजीप्रेमींनी विचारला आहे.
साने गुरुजींची कर्मभूमी, श्रीमंत प्रतापशेठजींची दानभूमी आणि संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी असा उल्लेख अमळनेर शहराचा केला जातो. निसर्गावर ,मुलांवर प्रेम करणारे, कामगार, स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या गुरुजींचे स्मारक अमळनेरात व्हावे. त्यांचे अपूर्ण राहिलेले आंतरभारती केंद्राचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून गुरुजींवर प्रेम करणाऱ्या लोकांनी साने गुरुजी स्मारक समिती स्थापन केली. खरे तर शासनाकडूनच हा प्रकल्प उभारला गेला पाहिजे होता. समितीने लोकसहभागातून सन २०१६ मध्येच गलवाडे शिवारात १३ एकर जागा घेतली. तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे २६ कोटींचा प्रस्ताव दिला. यात युवा क्षमता विकास, शिक्षण पूरक प्रशिक्षण, महिला, बालकुमार,साहित्य, सांस्कृतिक, नाटक तसेच युवकांना विविध भाषांचे ज्ञान , शेतकरी परिषद, कृषितज्ज्ञ मार्गदर्शन, अत्याधुनिक साधने प्रदर्शन, पॉलिहाऊस, वाचनालय, जिमखाना असे उद्दिष्ट आहे.
समितीने राजकीय आणि शासकीय दारे ठोठावली आहेत मात्र कटू अनुभव आले. एका राजकीय व्यक्तीने तुम्हाला निधीची गरज काय, तुम्हाला निधी देऊन राष्ट्रसेवा दलाकडून आम्हाला मते मिळणार नाहीत असे उत्तर दिले. तरीही १२ वर्षांपासून समिती संस्कार शिबिरे, वृक्षारोपण, पाणी आडवा, पाणी जिरवा असे उपक्रम राबवत आहेत.
कोट
निवडणुकांच्या प्रचारात साने गुरुजींचा फोटो छापतात. त्यांच्या नावाने राजकारण करतात; परंतु गुरुजींच्या स्वप्नासाठी पैसे देण्यात हात आखडता घेतात. याचीच खंत वाटते.- प्रा. डॉ. अ.गो. सराफ, अध्यक्ष, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान , अमळनेर.
कोट
सानेगुरुजींच्या विचारांनी युवा संस्कार प्रशिक्षण केंद्र उभारून युवा पिढी घडवायची असल्याने राजकीय ,सामाजिक लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे - दर्शना पवार , कार्यवाह, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान , अमळनेर
फोटो ओळ : प्रताप महाविद्यालयातील याच खोलीत साने गुरुजींचे वास्तव्य होते. त्यांच्या आठवणी जपून ठेवण्यात आल्या आहेत. - छाया अंबिका फोटो, अमळनेर