लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीला चार दिवस शिल्लक असतानाच महापालिकेत राजकीय भूकंप झाला असून, जळगावातही सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी भाजपचे ५७ पैकी तब्बल २७ हून अधिक नगरसेवक सेनेच्या गळाला लागले असून रविवारी सायंकाळीच सहलीला रवानाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत भाजपच्या सूत्रांनी देखील दुजोरा दिला आहे. यामुळे भाजपाचे संकटमोचक आ. गिरीश महाजन हेच अडचणीत आल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक फरार झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून सर्व नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला असून, महापौरपदासाठी सेनेच्या जयश्री महाजन यांचे नावदेखील निश्चित केले आहे.
जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. तर १८ रोजी नवीन महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी सत्ताधारी भाजपमध्येच चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती. रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक फरार झाल्यामुळे महापालिकेत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरसेवकांची संख्या २५ पेक्षा जास्त असल्यास शिवसेनेकडून महापालिकेत सेनेचा भगवा फडकण्याची शक्यता आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आ.गिरीश महाजन यांनी भाजपाच्या नगरसेवकांची तातडीची बैठक सायंकाळी बोलविली होती. मात्र, महाजन यांनाच उशीर होत असल्याने नंतर बैठकीचे स्थळ बदलून विमानतळावरच ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेतील बलाबल
भाजप - ५७
शिवसेना - १५
एमआयएम - ३